


बेळगाव : ऑनलाइन फूड डिलिव्हरी क्षेत्रातील आघाडीच्या स्विगी आणि झोमॅटो या प्लॅटफॉर्मच्या व्यावसायिक धोरणांमध्ये बदल करण्याच्या मागणीसाठी राज्यभर सुरू असलेल्या आंदोलनाला बेळगावमधील हॉटेल व्यावसायिकांनी ठाम पाठिंबा जाहीर केला आहे. ३० जुलै रोजी झालेल्या संयुक्त बैठकीत बेळगाव हॉटेल मालक संघटना आणि नॅशनल रेस्टॉरंट असोसिएशन ऑफ इंडिया (NRAI) उत्तर कर्नाटक विभागाने एकमताने हा निर्णय घेतला.
स्विगी आणि झोमॅटोकडून आकारले जाणारे वाढते कमिशन, मोठ्या सवलती देण्याची सक्ती, एकतर्फी व्यावसायिक अटी आणि त्याचा रेस्टॉरंट व्यवसायाच्या आर्थिक शाश्वततेवर होणारा विपरीत परिणाम याविरोधात बंगळुरूसह राज्यातील अनेक रेस्टॉरंट संघटनांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. या धोरणांमध्ये तातडीने सुधारणा न झाल्यास काही रेस्टॉरंट्सनी संबंधित प्लॅटफॉर्मवरील सेवा बंद करण्याचाही इशारा दिला आहे.
याच पार्श्वभूमीवर बेळगावमधील हॉटेल व्यावसायिकांनी NRAI आणि कर्नाटक राज्यातील हॉटेल संघटनांनी मांडलेल्या न्याय्य, पारदर्शक व शाश्वत व्यावसायिक व्यवस्थेच्या मागण्यांना संपूर्ण पाठिंबा दर्शविला आहे.
बैठकीत NRAI उत्तर कर्नाटक विभागाचे प्रमुख अक्षय कुलकर्णी यांनी देशभरातील रेस्टॉरंट उद्योगासमोरील आव्हानांचा आढावा घेतला. वाढते कमिशन आणि असमतोल व्यावसायिक धोरणांचा परिणाम केवळ रेस्टॉरंटच्या नफ्यावरच होत नाही, तर ग्राहकांना मिळणाऱ्या किमती, निवडीचे पर्याय, स्थानिक उद्योगांचे अस्तित्व आणि बाजारातील निरोगी स्पर्धेलाही त्याचा फटका बसत असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
रेस्टॉरंट उद्योगाचा तंत्रज्ञान किंवा ऑनलाइन फूड डिलिव्हरी सेवांना कोणताही विरोध नसून, सर्व संबंधित घटकांना समान संधी मिळेल, अशी न्याय्य, संतुलित आणि पारदर्शक व्यावसायिक व्यवस्था निर्माण करण्याचीच आपली मागणी असल्याचेही त्यांनी ठामपणे नमूद केले.

Belgaum Varta Belgaum Varta