


बंगळूर : विधानपरिषद निवडणुकीसंदर्भात उच्च न्यायालय आणि सर्वोच्च न्यायालयात झालेल्या दीर्घ कायदेशीर लढाईनंतर काँग्रेसच्या गायत्री शांतगौडा यांनी भाजपचे उमेदवार तथा तत्कालीन विधानपरिषद उपसभापती एम. के. प्राणेश यांचा ९ मतांनी पराभव केला.
निर्णयानंतर विधानसौध येथे प्रसारमाध्यमांशी बोलताना गायत्री शांतगौडा म्हणाल्या, “सत्याचा नेहमीच विजय होतो, हे आज पुन्हा सिद्ध झाले आहे.”
त्या म्हणाल्या की, सुरुवातीला विधानपरिषद निवडणुकीत त्या केवळ ६ मतांनी पराभूत झाल्या होत्या. निकालाला आव्हान देत त्यांनी उच्च न्यायालयात याचिका दाखल केली. न्यायालयाच्या आदेशानुसार झालेल्या फेरमतमोजणीचा निकाल बंद लिफाफ्यात सादर करण्यात आला असून त्यामध्ये त्या ९ मतांनी विजयी झाल्याचे स्पष्ट झाले.
स्थानिक स्वराज्य संस्थांतील नामनिर्देशित सदस्यांना विधानपरिषद निवडणुकीत मतदानाचा अधिकार नसल्याचा स्पष्ट निर्णय उच्च न्यायालयाने दिला होता. या निर्णयाविरोधात एम. के. प्राणेश यांनी सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली. मात्र, सर्वोच्च न्यायालयाने त्यांची याचिका फेटाळून लावत उच्च न्यायालयाचा निर्णय कायम ठेवला. त्यामुळे अखेर न्याय मिळाल्याचा आनंद असल्याचे गायत्री शांतगौडा यांनी सांगितले.
या विजयाबद्दल त्यांनी आपल्या वकिलांचे तसेच मुख्यमंत्री डी. के. शिवकुमार, माजी मुख्यमंत्री सिद्धरामय्या, काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष बी. के. हरिप्रसाद, सोनिया गांधी, राहुल गांधी आणि पक्षातील सर्व नेते व कार्यकर्त्यांचे आभार मानले.
विधानपरिषदेचा अद्याप दीड वर्षांचा कार्यकाळ शिल्लक असून, पुढील कार्यवाहीबाबत उच्च न्यायालयाने सभापतींना आवश्यक सूचना दिल्याची माहितीही त्यांनी दिली.
प्रकरण काय होते?
डिसेंबर २०२१ मध्ये झालेल्या चिक्कमंगळूर स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघाच्या विधानपरिषद निवडणुकीत भाजपचे एम. के. प्राणेश यांनी गायत्री शांतगौडा यांचा ६ मतांनी पराभव केला होता. या निवडणुकीत नगरपंचायतींचे १२ नामनिर्देशित सदस्य मतदानात सहभागी झाले होते.
नामनिर्देशित सदस्यांना मतदानाचा अधिकार नसल्याने त्यांची मते घटनाबाह्य असल्याचा दावा करत गायत्री शांतगौडा यांनी न्यायालयात याचिका दाखल केली होती. उच्च न्यायालयाने हा दावा मान्य करत १२ मते अवैध ठरवली आणि ती वगळून फेरमतमोजणी करण्याचे आदेश दिले.
या आदेशाला एम. के. प्राणेश यांनी सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिले. मात्र, सर्वोच्च न्यायालयानेही उच्च न्यायालयाचा निर्णय कायम ठेवत फेरमतमोजणीचा अहवाल बंद लिफाफ्यात सादर करण्याचे निर्देश दिले होते. अखेरीस फेरमतमोजणीत गायत्री शांतगौडा ९ मतांनी विजयी ठरल्या.

Belgaum Varta Belgaum Varta