Monday , August 17 2026
Breaking News

कवयित्री स्मिता किल्लेकर यांच्या ‘गंध मातीचा’ काव्यवाचनाने रसिक मंत्रमुग्ध

Spread the love

 

शब्दगंध कवी मंडळ संघातर्फे कवी समजून घेताना उपक्रमाचे आठवे पुष्प

बेळगाव : शब्दगंध कवी मंडळ संघ, बेळगाव आणि राज्य मराठी विकास संस्था, मुंबई यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित ‘गंध मातीचा’ या कवयित्री सौ. स्मिता दीपक किल्लेकर यांच्या काव्यवाचनाचा कार्यक्रम आणि उपस्थितांचे खुले कवी संमेलन उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाले. मराठी विद्यानिकेतन येथे झालेल्या या कार्यक्रमाला साहित्यप्रेमी, कवी, कवयित्री आणि रसिकांची उत्स्फूर्त उपस्थिती लाभली.
प्रारंभी लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांच्या जयंती निमित्त त्यांच्या प्रतिमेला स्मिता किल्लेकर यांच्या हस्ते पुष्पहार घालून अभिवादन करण्यात आले. यावेळी व्यासपीठावर शब्दगंध कवी मंडळ संघाचे अध्यक्ष प्रा. अशोक आलगोंडी, उपाध्यक्ष बसवंत शहापूरकर आणि सचिव सुधाकर गावडे उपस्थित होते. प्रास्ताविक शब्दगंध कवी मंडळाच्या सदस्या रेखा गद्रे यांनी केले.
मुख्य काव्यवाचन सत्रात सौ. स्मिता किल्लेकर यांनी आपल्या विविध विषयांवरील निवडक कवितांचे प्रभावी सादरीकरण केले. ‘आदिमाया’ या कवितेतून “तुझ्या डोळ्याच्या डोहात पाणी खोल खोल…” या ओळींतून आईच्या प्रेमाची अथांगता, वात्सल्य आणि त्यागाचे हृदयस्पर्शी चित्र त्यांनी उभे केले. ‘आधुनिक ओवी’ या रचनेतून लोकपरंपरेतील ओवीला आधुनिक जीवनाचा संदर्भ देत बदलत्या समाजाचे वास्तव मांडले.

‘अस्तित्व’ या कवितेत स्त्रीच्या स्वाभिमानाचा, आत्मभानाचा आणि स्वतःचे अस्तित्व जपण्याच्या संघर्षाचा प्रभावी आविष्कार घडला. ‘आनंदाचा ठेवा’ या अभंगातून “ग्रंथ हेच गुरु, जीवन साकारू” असा संदेश देत वाचनसंस्कृतीचे महत्त्व त्यांनी अत्यंत समर्पक शब्दांत मांडले.
निसर्ग आणि शेतकरी जीवनाचे चित्रण करणाऱ्या ‘बरसान’ या कवितेतील “पड पड रे पावसा…” ही आर्त साद आणि ‘झिम्माड पाऊस’ या कवितेतील “काळ्या मातीच्या कुशीत फुटे अंकुर हिरवा” हा आशावाद रसिकांच्या मनाला स्पर्शून गेला. तर ‘आक्रोश’ या कवितेत विकासाच्या नावाखाली उद्ध्वस्त होणाऱ्या शेतीची वेदना आणि शेतकऱ्यांच्या असहाय्यतेचे अत्यंत प्रभावी चित्रण करण्यात आले. “उभ्या पिकावर फिरत गेला बुलडोझर…” या ओळींनी सभागृहात क्षणभर गंभीर वातावरण निर्माण केले.
‘गड जेजुरी’ या कवितेतून श्री खंडोबाच्या भक्तीचे, जेजुरीच्या सांस्कृतिक वैभवाचे आणि लोकश्रद्धेचे दर्शन घडले. ‘शुभमंगल सावधान’ या कवितेत वैवाहिक जीवनातील वास्तव आणि सामाजिक मूल्यांवर भाष्य करण्यात आले, तर ‘भारूड’ या रचनेतून समाजातील विसंगतींवर उपरोधिक शैलीत भाष्य करून विचारप्रवृत्त केले.
कार्यक्रमाच्या शेवटी सादर झालेली ‘माझी सखी’ ही कविता विशेष दाद मिळवून गेली. “एका एका अक्षरात सजते, शब्दा शब्दात रंगून जाते, अंतरंगात हळुवार उमलते, माझी कविता सखी बनते” या ओळींनी कवयित्रींचे कवितेशी असलेले जिव्हाळ्याचे नाते अधोरेखित केले. प्रत्येक कवितेनंतर रसिकांनी टाळ्यांच्या कडकडाटात उत्स्फूर्त प्रतिसाद देत कवयित्रींच्या साहित्यसाधनेचा गौरव केला.
यावेळी झालेल्या खुल्या कवी संमेलनात बेळगाव आणि परिसरातील अनेक कवी-कवयित्रींनी आपल्या स्वरचित कविता सादर केल्या. यामधे मनीषा नाडगौडा, अस्मिता आळतेकर, स्नेहल बर्डे, गुरुनाथ किरमटे, चंद्रशेखर गायकवाड, रेखा गद्रे, सीमा कणबरकर, गौरी धामनेकर, अपर्णा पाटील, मधु पाटील, शुभदा खानोलकर, बसवंत शहापूरकर, प्रा. महादेव खोत, सुधाकर गावडे, परशराम खेमने आदींच्या पाऊस, निसर्ग, समाज, राष्ट्रभक्ती, स्त्रीजीवन आणि मानवी मूल्ये अशा विविध विषयांवरील काव्यसादरीकरणामुळे कार्यक्रम अधिक रंगतदार झाला.
कार्यक्रमाच्या अध्यक्षीय समारोपात प्रा. अशोक आलगोंडी यांनी स्मिता किल्लेकर यांच्या कवितांचा चिकित्सक आढावा घेतला. त्यांच्या कवितांमध्ये मातृत्व, ग्रामीण संस्कृती, निसर्ग, सामाजिक भान, अध्यात्म, स्त्रीमन आणि मानवी संवेदना यांचा सुंदर संगम असल्याचे त्यांनी नमूद केले. सहज, प्रवाही आणि वाचकांच्या मनात थेट पोहोचणारी भाषा हे त्यांच्या कवितेचे बलस्थान असून, त्यांच्या कविता केवळ भावस्पर्शी नसून समाजाला विचार करायला लावणाऱ्या आहेत, असे मत त्यांनी व्यक्त केले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन रेखा गद्रे यांनी तर आभार सुधाकर गावडे यांनी मानले.

About Belgaum Varta

Check Also

मंगळागौरीच्या पारंपरिक खेळांनी रंगला ‘सखी’चा सांस्कृतिक सोहळा

Spread the love  बेळगाव : महाराष्ट्राच्या समृद्ध लोकपरंपरेचा सुगंध, मंगळागौरीच्या खेळांचा उत्साह आणि महिलांच्या कलागुणांची …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *