


बेळगाव (वार्ता) : जिल्ह्यात सुरू असलेल्या मुसळधार पावसाच्या पार्श्वभूमीवर सार्वजनिक बांधकाम मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री सतीश जारकीहोळी यांनी विविध सिंचन कालव्यांची प्रत्यक्ष पाहणी करून अधिकाऱ्यांना आवश्यक सूचना दिल्या. शेतकऱ्यांना सिंचनासाठी पाण्याची कोणतीही कमतरता भासू नये, यासाठी कालव्यांचे प्रभावी व्यवस्थापन करण्याचे निर्देश त्यांनी दिले.
रविवारी सकाळी हुक्केरी तालुक्यातील हिडकल धरणाच्या उजव्या कालव्याची पाहणी करताना मंत्री जारकीहोळी यांनी गोडचिनमळकी, गोडगेरी आणि मेलमट्टी परिसरातील कालव्यांमधील पाण्याचा प्रवाह, देखभाल, दुरुस्तीची आवश्यकता आणि शेवटच्या टोकावरील शेतकऱ्यांपर्यंत पाणी पोहोचण्याच्या व्यवस्थेचा आढावा घेतला. यावेळी त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांकडून कामांची माहिती घेत तातडीने दुरुस्ती व देखभाल करण्याचे आदेश दिले.
यापूर्वी त्यांनी यरगट्टी तालुक्यातील कोडलीवाड, गोकाक तालुक्यातील काउजलगी (जीआरबीसी मुख्य कालवा), रायबाग तालुक्यातील मुगळखोड चौकी (जीएलबीसी मुख्य कालवा) तसेच रायबाग–मेखळी तलाव परिसराचीही पाहणी केली होती.
नंतर सिंचन विभागाच्या अधिकाऱ्यांसोबत झालेल्या बैठकीत जारकीहोळी यांनी जलाशयातून पाणी सोडण्यापूर्वी कालव्यांतील गाळ काढणे आणि झाडी साफ करण्याची कामे पूर्ण करण्याचे निर्देश दिले. तसेच कालव्याच्या शेवटच्या टोकावरील शेतकऱ्यांच्या शेतांपर्यंतही पाणी पोहोचेल, याची दक्षता घेण्याचे सांगितले.
“यंदा मान्सूनमधील अनियमित पावसामुळे अनेक शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे. अनेकांनी कालव्याच्या पाण्यावर अवलंबून पेरणी केली असून अधिकाऱ्यांनी अधिक जबाबदारीने काम करावे,” असे मंत्री जारकीहोळी यांनी यावेळी सांगितले.
यावेळी स्थानिक शेतकरी नेत्यांनी मंत्री सतीश जारकीहोळी यांचा सत्कार केला. सिंचन विभागाचे वरिष्ठ अधिकारी, अभियंते, स्थानिक नेते आणि मोठ्या संख्येने शेतकरी उपस्थित होते.

Belgaum Varta Belgaum Varta