


बेळगाव : जिल्ह्यात काही भागांत मुसळधार पाऊस तर काही ठिकाणी पावसाची उघडीप अशी परिस्थिती असताना, सातत्याने होत असलेल्या पावसामुळे कृष्णा नदीच्या पाणीपातळीत मोठी वाढ झाली आहे. यामुळे जामखंडी–मिरज राज्य महामार्गावरील कुडची–उगारखुर्द संपर्क पूल रविवारी पुन्हा एकदा पूर्णपणे पाण्याखाली गेला असून या मार्गावरील वाहतूक पूर्णतः ठप्प झाली आहे.
रायबाग तालुक्यातील कुडची आणि महाराष्ट्रातील उगारखुर्द यांना जोडणारा हा महत्त्वाचा पूल यावर्षी दुसऱ्यांदा पुराच्या पाण्यात बुडाला आहे. तसेच चिक्कोडी उपविभागात यंदाच्या पावसाळ्यात पाण्याखाली गेलेला हा आठवा पूल ठरला आहे.
कर्नाटक, महाराष्ट्र आणि गोवा या राज्यांना जोडणारा हा महत्त्वाचा दळणवळणाचा मार्ग असून दररोज शेकडो बस, ट्रक आणि इतर वाहने या मार्गावरून प्रवास करतात. पूल पाण्याखाली गेल्यामुळे वाहनचालकांना सुमारे ५० किलोमीटरचा अतिरिक्त वळसा घालून पर्यायी मार्गाचा वापर करावा लागत आहे.
कोणताही अपघात होऊ नये म्हणून खबरदारीचा उपाय म्हणून कुडची पोलिसांनी पुलाच्या दोन्ही बाजूंना बॅरिकेड्स उभारून वाहतुकीवर पूर्ण बंदी घातली आहे. पुरस्थितीवर प्रशासनाकडून सातत्याने लक्ष ठेवले जात असून, पाणीपातळी कमी झाल्यानंतरच वाहतूक पूर्ववत सुरू केली जाईल, अशी माहिती जिल्हा प्रशासनाने दिली आहे.

Belgaum Varta Belgaum Varta