


बडस ईनाम : बडस ईनाम गावात एका दुर्दैवी घटनेत युवा शेतकरी कल्लाप्पा भीमाना पाटील यांचा सुमारे चार लाख रुपये किमतीचा शर्यतीचा बैल विहिरीत पडून मृत्युमुखी पडल्याने गावात हळहळ व्यक्त होत आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, कल्लाप्पा पाटील यांच्या घरातून बैल अचानक दोर तोडून बाहेर पडला आणि सैरावैरा पळू लागला. त्याला आवरण्यासाठी अनेक ग्रामस्थांनी प्रयत्न केले, मात्र बैल कोणाच्याही ताब्यात आला नाही. अखेर मोरब रस्त्यावर कल्लाप्पा पाटील यांनी बैलाला पकडून झाडाला बांधले. परंतु बैलाने तेथूनही दोर तोडला आणि धावत जाऊन थेट एका विहिरीत उडी घेतली.
आपला लाडका बैल वाचविण्याच्या उद्देशाने कल्लाप्पा पाटील यांनीही क्षणाचाही विलंब न करता विहिरीत उडी घेतली. मात्र बैलाला वाचविण्याचे त्यांचे प्रयत्न निष्फळ ठरले. दैव बलवत्तर असल्याने कल्लाप्पा पाटील सुखरूप बाहेर आले, मात्र बैलाचा मृत्यू झाला. विहिरीत उडी घेताना बैलाची मान मोडल्याने त्याचा जागीच मृत्यू झाल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे.
घटनेची माहिती मिळताच गावातील शेकडो युवक घटनास्थळी जमा झाले. बैलाला बाहेर काढण्यासाठी प्रयत्न करण्यात आले, मात्र त्याला वाचविणे शक्य झाले नाही. अखेर जेसीबीच्या सहाय्याने बैलाचा मृतदेह विहिरीतून बाहेर काढण्यात आला आणि त्याच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले.
या अपघातामुळे शेतकरी कल्लाप्पा पाटील यांचे मोठे आर्थिक नुकसान झाले असून, गावात आणि परिसरात शोककळा पसरली आहे. संबंधित शेतकऱ्याला शासनाकडून आर्थिक मदत मिळावी, अशी मागणी ग्रामस्थांकडून करण्यात येत आहे.

Belgaum Varta Belgaum Varta