


२४ फेब्रुवारी ते ४ मार्चदरम्यान भव्य धार्मिक सोहळा; पूर्वतयारीला वेग, भूमिपूजन संपन्न
खानापूर : खानापूर तालुक्यातील कारलगा, कारलगा हट्टी आणि शिवोली या तीन गावांचे श्रद्धास्थान असलेल्या श्री महालक्ष्मी देवीची बहुप्रतीक्षित महायात्रा तब्बल १९ वर्षांनंतर २४ फेब्रुवारी ते ४ मार्च २०२७ या कालावधीत भव्य स्वरूपात पार पडणार आहे. या ऐतिहासिक धार्मिक सोहळ्याच्या पूर्वतयारीला आता वेग आला असून, आमदार विठ्ठलराव हलगेकर यांच्या प्रमुख उपस्थितीत नियोजन बैठक उत्साहात पार पडली. बैठकीचे अध्यक्षस्थान ज्येष्ठ नागरिक मनोहर पाटील यांनी भूषविले.
यावेळी खानापूर भाजप अध्यक्ष बसवराज सानिकोप, भाजप नेत्या धनश्री सरदेसाई, भाजप नेते जोतिबा रेमानी, मल्लाप्पा मारीहाळ, युवा नेते दत्ता कदम यांच्यासह दोन्ही ग्रामपंचायतींचे पीडीओ, यात्रा समिती, पंच कमिटीचे पदाधिकारी आणि तिन्ही गावांतील ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
महायात्रेदरम्यान नऊ दिवस श्री महालक्ष्मी देवी विराजमान होणार असलेल्या पवित्र स्थळाच्या सुशोभीकरण व विकासकामांचे भूमिपूजन आमदार विठ्ठलराव हलगेकर, मान्यवर आणि ग्रामस्थांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी परिसरात भक्तिमय वातावरण निर्माण झाले होते.
“भाविकांची गैरसोय होणार नाही” : आमदार हलगेकर
यावेळी बोलताना आमदार विठ्ठलराव हलगेकर यांनी महायात्रा यशस्वी, भव्य आणि निर्विघ्न पार पाडण्यासाठी सर्वतोपरी सहकार्य करण्याची ग्वाही दिली. यात्रेला येणाऱ्या हजारो भाविकांसाठी पिण्याचे पाणी, स्वच्छता, रस्ते, वीज, प्रथमोपचार, वाहतूक नियंत्रण आणि सुरक्षा यासह सर्व मूलभूत सुविधा प्रशासनामार्फत उपलब्ध करून दिल्या जातील, असे त्यांनी स्पष्ट केले.
ऊस उत्पादक शेतकऱ्यांना मोठा दिलासा
तिन्ही गावांतील ऊस उत्पादक शेतकऱ्यांसाठीही आमदार हलगेकर यांनी महत्त्वाची घोषणा केली. संबंधित गावांतील सर्व ऊस आपल्या कारखान्यामार्फत उचलला जाईल आणि उसाची बिलेही तातडीने अदा करण्यात येतील, असे आश्वासन त्यांनी दिले. त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये समाधानाचे वातावरण निर्माण झाले.
“लोकप्रतिनिधी नव्हे, कुटुंबातील सदस्य म्हणून काम करणार”
कारलगा व कारलगा हट्टी ही गावे हेब्बाळ ग्रामपंचायतीअंतर्गत, तर शिवोली हे चापगाव ग्रामपंचायतीअंतर्गत येत असले तरी महायात्रेच्या आयोजनासाठी तिन्ही गावांनी एकजुटीने काम करावे, असे आवाहन करताना, “मी लोकप्रतिनिधी म्हणून नव्हे, तर तुमच्या कुटुंबातील सदस्य म्हणून महायात्रा यशस्वी करण्यासाठी सदैव तुमच्या पाठीशी उभा राहीन,” असे भावनिक उद्गार आमदार हलगेकर यांनी काढले.
ग्रामस्थांची प्रशासनाकडे सुविधांची मागणी
यात्रेच्या काळात पोलीस बंदोबस्त, वाहतूक व्यवस्था, पिण्याचे पाणी, स्वच्छता, आरोग्य सेवा, प्रथमोपचार केंद्र, प्रकाश व्यवस्था आणि इतर आवश्यक शासकीय सुविधा उपलब्ध करून द्याव्यात, अशी मागणी ग्रामस्थांच्या वतीने निवेदनाद्वारे आमदार विठ्ठलराव हलगेकर यांच्याकडे करण्यात आली.
तब्बल १९ वर्षांनंतर होत असलेल्या श्री महालक्ष्मी महायात्रेमुळे कारलगा, कारलगा हट्टी आणि शिवोली परिसरात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले असून, धार्मिक परंपरा, ग्रामएकता आणि भक्तिभावाचा अद्वितीय संगम अनुभवण्याची तयारी आता अंतिम टप्प्यात पोहोचली आहे.

Belgaum Varta Belgaum Varta