


मोबाईलवर कंपन्यांचे संदेश; आधार, बँक पासबुक व गॅस बुकसह तातडीने पडताळणीचे आवाहन
बेळगाव : सरकारकडून विविध कल्याणकारी योजनांची फेरपडताळणी सुरू असतानाच आता घरगुती एलपीजी गॅस ग्राहकांसाठीही ई-केवायसी अनिवार्य करण्यात आली आहे. गॅस कंपन्यांनी ग्राहकांच्या मोबाईलवर संदेश पाठवून १४ ऑगस्टपूर्वी ई-केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन केले असून, मुदतीत प्रक्रिया पूर्ण न झाल्यास गॅस पुरवठ्यावर परिणाम होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. त्यामुळे लाखो ग्राहकांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे.
अन्न व नागरी पुरवठा विभागाने रेशन कार्डधारकांना सप्टेंबरपर्यंत ई-केवायसीची मुदत दिल्यानंतर आता गॅस कंपन्यांनीही पडताळणी मोहीम वेगाने सुरू केली आहे. ज्या ग्राहकांनी मागील पाच वर्षांत ई-केवायसी केलेली नाही, त्यांनी तातडीने नव्याने पडताळणी करून घ्यावी, अशा सूचना वितरकांकडून देण्यात येत आहेत.
ई-केवायसीसाठी ग्राहकांनी गॅस ग्राहक पुस्तिका, आधार कार्ड आणि बँक पासबुक घेऊन संबंधित गॅस एजन्सीत उपस्थित राहणे आवश्यक आहे. अचानक सुरू झालेल्या या मोहिमेमुळे शहरातील गॅस एजन्सींमध्ये ग्राहकांची मोठी गर्दी होत असून चौकशीसाठीही रांगा लागल्या आहेत.
दरम्यान, युद्धजन्य परिस्थितीमुळे काही महिन्यांपूर्वी एलपीजी पुरवठ्यावर परिणाम झाला होता. सध्या सिलिंडरचा तुटवडा नसला तरी नोंदणीच्या नियमांमध्ये झालेल्या बदलामुळे घरगुती गॅस सिलिंडरसाठी २५ दिवसांनंतरच नव्याने बुकिंग करता येत आहे. त्यातच ई-केवायसीची सक्ती झाल्याने ग्राहकांचा संभ्रम आणखी वाढला आहे.
एकाच वेळी गॅस बुकिंगचे बदललेले नियम, ई-केवायसीची सक्ती आणि अंतिम मुदतीचा दबाव यामुळे नागरिकांची धावपळ सुरू झाली आहे. त्यामुळे कोणताही अडथळा टाळण्यासाठी १४ ऑगस्टपूर्वी ई-केवायसी पूर्ण करून घ्यावी, असे आवाहन गॅस वितरकांकडून करण्यात येत आहे.

Belgaum Varta Belgaum Varta