

बेळगाव : बेळगावातील उपनोंदणी कार्यालयात स्वतःला मालमत्तेचा मूळ मालक असल्याचे भासवून दुसऱ्याची मालमत्ता विक्री केल्याप्रकरणी मार्केट पोलिसांनी एका आरोपीला अटक केली आहे.
याप्रकरणी उचगाव येथील कचेरी गल्लीतील रहिवासी रफीक इमाम शहापूरकर (वय ५७) यांनी ४ जानेवारी २०२५ रोजी मार्केट पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती. आपल्या मालमत्तेची फसवणूक करून अज्ञात व्यक्तीने विक्री केल्याची तक्रार त्यांनी दिली होती. त्यानुसार मार्केट पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक ०६/२०२५ अंतर्गत भारतीय दंड संहितेच्या कलम ४२०, ४१९, ४६५, ४६८, ४७१ व ४७४ अन्वये गुन्हा नोंद करण्यात आला होता.
तपासादरम्यान पोलिसांनी कागदपत्रांची छाननी केली असता, उचगाव येथील अनगोळ गल्लीतील खलंदर गुलाब पटेल (वय ५३) याने फिर्यादीच्या काकाच्या नावाने स्वतःला मालमत्तेचा मूळ मालक म्हणून उपनोंदणी कार्यालयात हजर राहिल्याचे उघड झाले. त्याने खऱ्या मालकाच्या जागी बसून वेबकॅमेऱ्यासमोर छायाचित्र काढले, अंगठ्याचा ठसा दिला आणि संबंधित मालमत्तेची खरेदी-विक्री नोंदणी करून ती दुसऱ्या व्यक्तीच्या नावावर केली. त्यामुळे फिर्यादी व त्यांच्या नातेवाईकांची फसवणूक झाल्याचे तपासात स्पष्ट झाले.
या प्रकरणी पोलिसांनी ३ ऑगस्ट २०२६ रोजी आरोपीला अटक करून न्यायालयासमोर हजर केले असून त्याला न्यायालयीन कोठडीत पाठविण्यात आले आहे.
या गुन्ह्याचा छडा लावून आरोपीला अटक करण्याची कारवाई मार्केट पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक जे. एम. कालिमिर्ची, पोलीस उपनिरीक्षक एच. एल. केरूर आणि त्यांच्या पथकाने केली. त्यांच्या कामगिरीचे पोलीस आयुक्त तसेच उपायुक्तांनी कौतुक केले आहे.
Belgaum Varta Belgaum Varta