

महाराष्ट्र एकीकरण समितीवर बंदी, उत्तर कर्नाटकावर श्वेतपत्रिका आणि कावेरीवर ठाम भूमिका घ्या; वाटाळ नागराज यांचा सरकारला इशारा
बेळगाव : “बेळगाव हा कर्नाटकचा अविभाज्य भाग आहे,” असा ठराव बेळगाव महापालिकेने तातडीने मंजूर करावा, अन्यथा महापालिका बरखास्त करण्याची शिफारस नगरविकास मंत्री यतीन्द्र यांच्याकडे करण्यात येईल, असा थेट इशारा कन्नड चळवळीचे ज्येष्ठ नेते वाटाळ नागराज यांनी दिला.
“गेल्या चार महिन्यांपासून कन्नड संघटना सातत्याने रस्त्यावर उतरून आंदोलन करत आहेत. तरीही महापालिकेने अद्याप ठराव मंजूर केलेला नाही. हा विलंब खपवून घेतला जाणार नाही. महापालिकेने तातडीने आपली भूमिका स्पष्ट करावी,” असे सांगत त्यांनी महापालिकेच्या दिरंगाईवर जोरदार हल्लाबोल केला.
यावेळी त्यांनी महाराष्ट्र एकीकरण समिती (एमईएस)वर तातडीने बंदी घालण्याची मागणी पुन्हा एकदा लावून धरली. सीमाभागातील विकासाला गती देणे, कन्नड भाषिक युवकांना रोजगारात प्राधान्य देणे आणि कन्नड माध्यमाच्या शाळांना विशेष प्रोत्साहन देणे, ही सरकारची जबाबदारी असल्याचे त्यांनी ठामपणे सांगितले.
उत्तर कर्नाटकाच्या विकासावरही त्यांनी सरकारला धारेवर धरले. शेतकरी, सिंचन, जलसंपदा, वीज आणि औद्योगिक विकासासारख्या मूलभूत प्रश्नांकडे सातत्याने दुर्लक्ष झाल्याचा आरोप करत उत्तर कर्नाटकाच्या विकासावर राज्य सरकारने तातडीने श्वेतपत्रिका जाहीर करावी, अशी मागणी त्यांनी केली. आगामी विधानमंडळ अधिवेशनात उत्तर कर्नाटकासाठी नेमके काय केले, याचा स्पष्ट हिशेब मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी जनतेसमोर मांडावा, असे आव्हानही त्यांनी दिले.
कावेरी नदीच्या पाणीवाटपाच्या प्रश्नावरही त्यांनी सरकारवर जोरदार टीका केली. तामिळनाडूमध्ये कावेरीच्या पाण्यासाठी तीव्र आंदोलन सुरू असताना कर्नाटक सरकारने राज्याच्या हक्कासाठी अधिक ठाम, आक्रमक आणि संघर्षशील भूमिका घ्यावी, अशी मागणी त्यांनी केली.
राज्यातील पाणीप्रश्न, महादायी, सिंचन योजना आणि उत्तर कर्नाटकाच्या विकासासाठी १३ ऑगस्ट रोजी पुकारण्यात आलेल्या ‘कर्नाटक बंद’ला जनतेने उत्स्फूर्त प्रतिसाद देऊन यशस्वी करावे, असे आवाहनही वाटाळ नागराज यांनी केले.
Belgaum Varta Belgaum Varta