Tuesday , August 18 2026
Breaking News

अखेर बिबट्या जेरबंद!

Spread the love

 

सुतकटीच्या जंगलातील आठ दिवसांची दहशत संपली; वन विभागाच्या सापळ्यात अडकला नरभक्षकाच्या धर्तीचा बिबट्या

बेळगाव : बेळगाव तालुक्यातील वंटमुरी घाटामागील सुतकटी (सुतगट्टी) गावाच्या वनक्षेत्रात गेल्या आठ-दहा दिवसांपासून ग्रामस्थांची झोप उडविणारा बिबट्या अखेर वन विभागाच्या सापळ्यात जेरबंद झाला. बुधवारी पहाटे पिंजऱ्यात अडकलेल्या बिबट्याला वन विभागाने सुरक्षित ताब्यात घेतल्याने सुतकटी, शिवापूर आणि परिसरातील नागरिकांनी सुटकेचा निश्वास टाकला.

सुतकटी व शिवापूर परिसरात बिबट्याचा सातत्याने वावर असल्याने भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. अनेक ग्रामस्थ, शेतकरी तसेच वाहनचालकांना हा बिबट्या वारंवार दिसला होता. त्याचे व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाल्यानंतर नागरिकांनी काकती वन विभागाकडे तातडीने धाव घेतली.

तक्रारीची गंभीर दखल घेत वन विभागाने परिसरात गस्त वाढवून बिबट्याच्या हालचालींवर बारकाईने लक्ष ठेवले. सुतकटीच्या वनक्षेत्रात काही दिवसांपूर्वी लावण्यात आलेल्या पिंजऱ्यात अखेर बुधवारी सकाळी बिबट्या अडकला आणि वन विभागाच्या नियोजनबद्ध मोहिमेला यश मिळाले.

ही कारवाई काकतीचे आरएफओ बी. एल. सनदी, हुक्केरीचे आरएफओ शिवकुमार माळी, डीआरएफओ बसवराज हनगंडी, प्रभू तंगडी, राकेश मुरारी, मुतगेकर तसेच काकती वन विभागाच्या कर्मचाऱ्यांनी यशस्वीपणे पार पाडली. सुतकटी गावातील ग्रामस्थांनीही या मोहिमेत मोलाचे सहकार्य करून वन विभागाच्या कार्याला हातभार लावला.

About Belgaum Varta

Check Also

भटक्या कुत्र्यांचा धुमाकूळ; ७५ वर्षीय वृद्धावर जीवघेणा हल्ला

Spread the love  महांतेश नगरमध्ये संतापजनक घटना; पाय व मांडीला सात-आठ वेळा चावा, मोठ्या प्रमाणात …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *