Sunday , August 16 2026
Breaking News

लवकरच मंत्रिमंडळात महिलांना स्थान; मंत्री लक्ष्मण सवदी यांचे संकेत

Spread the love

 

बेळगाव : कर्नाटक राज्य मंत्रिमंडळात लवकरच महिलांना मंत्रिपद देण्यात येण्याची शक्यता आहे. मुख्यमंत्री डी. के. शिवकुमार याबाबत विचारविनिमय करत असल्याची माहिती मंत्री लक्ष्मण सवदी यांनी दिली.

बेळगाव येथे शुक्रवारी पत्रकारांशी बोलताना सवदी म्हणाले की, दिल्लीतील पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांनी जिल्ह्यातील सर्व काँग्रेस नेत्यांनी एकजुटीने काम करण्याच्या सूचना दिल्या आहेत. २०२८ मध्ये पक्षाला पुन्हा सत्तेत आणण्याच्या उद्देशाने सर्वांनी एकत्रितपणे काम करावे, असे निर्देश देण्यात आले आहेत.

मंत्रिपदाला कोणते खाते मिळाले यावर चर्चा करण्यापेक्षा मिळालेली जबाबदारी योग्य पद्धतीने पार पाडणे महत्त्वाचे आहे. कोणतेही खाते मिळाले तरी ते प्रभावीपणे हाताळल्यास त्या खात्याला महत्त्व प्राप्त होते, असे सवदी यांनी स्पष्ट केले.

विधानपरिषदेचे सभापती बसवराज होरट्टी यांना गुंडांप्रमाणे पदावरून हटवण्यात आल्याच्या भाजप नेत्यांच्या आरोपावर प्रतिक्रिया देताना सवदी म्हणाले की, होरट्टी यांच्याबद्दल मला मोठा आदर आहे. मुख्यमंत्र्यांकडून सत्कार स्वीकारल्यानंतर त्यांनी सन्मानपूर्वक सभापतीपद सोडले. या प्रकरणातील अंतर्गत बाबींची मला माहिती नसल्याने त्यावर भाष्य करणार नाही.

भाजपने सुरू केलेल्या दुष्काळ पाहणी दौऱ्यावरही त्यांनी टीका केली. विरोधी पक्ष म्हणून विविध भागात जाऊन परिस्थितीची पाहणी करणे आणि ती अधिवेशनात सरकारच्या निदर्शनास आणून देणे हे भाजपचे कर्तव्य आहे. विरोधी पक्षाने नेमके काय करावे, असा सवाल करत त्यांनी भाजपवर टोला लगावला.

१३६ आमदारांचे संख्याबळ असूनही सरकारने अद्याप कामाला सुरुवात केलेली नाही, या भाजपच्या आरोपावर सवदी यांनी पलटवार केला. भाजपला राजकीयदृष्ट्या सक्रिय राहायचे असेल तर अशा मुद्द्यांवर चर्चा करावीच लागेल, अन्यथा पक्ष ‘कोमात’ जाईल, अशी खोचक टीका त्यांनी केली. २०२८ मध्ये विरोधी पक्षात बसण्याची संधीही मिळणार नाही, अशी परिस्थिती निर्माण होऊ शकते. त्यामुळे सध्या असलेल्या जागा टिकवण्यासाठी भाजप नेत्यांना धावपळ करावी लागेल, असेही ते म्हणाले.

मुख्यमंत्री डी. के. शिवकुमार यांच्या सूचनेनुसार विविध जिल्ह्यांतील अतिवृष्टी आणि अनावृष्टीच्या परिस्थितीचा आढावा घेऊन अहवाल तयार केला जात आहे. आपण स्वतः दोन दिवस उत्तर कन्नडसह सहा जिल्ह्यांचा दौरा करून परिस्थितीची पाहणी केली आहे. सोमवारी होणाऱ्या मंत्रिमंडळ बैठकीत हा अहवाल सादर करण्यात येणार असून, ज्या ठिकाणी तातडीने उपाययोजना करण्याची गरज आहे, तेथे सरकार आवश्यक ती कार्यवाही करेल, असे सवदी यांनी सांगितले.

About Belgaum Varta

Check Also

मंगळागौरीच्या पारंपरिक खेळांनी रंगला ‘सखी’चा सांस्कृतिक सोहळा

Spread the love  बेळगाव : महाराष्ट्राच्या समृद्ध लोकपरंपरेचा सुगंध, मंगळागौरीच्या खेळांचा उत्साह आणि महिलांच्या कलागुणांची …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *