Monday , August 17 2026
Breaking News

डॉ. दीपक पवार यांची महाराष्ट्र एकीकरण युवा समिती सीमाभागच्या पदाधिकाऱ्यांशी सीमाप्रश्नावर सविस्तर चर्चा

Spread the love

 

मुंबई : महाराष्ट्र-कर्नाटक सीमाप्रश्नाचा अभ्यासू, कायदेशीर आणि सातत्यपूर्ण पाठपुरावा करणारे मुंबई विद्यापीठाच्या राज्यशास्त्र विभागाचे प्रमुख तसेच मराठी अभ्यास केंद्रचे अध्यक्ष डॉ. दीपक पवार यांची घाटकोपर, मुंबई येथील त्यांच्या निवासस्थानी महाराष्ट्र एकीकरण युवा समिती सीमाभागच्या पदाधिकाऱ्यांनी सदिच्छा भेट घेतली.

या भेटीत समितीचे अध्यक्ष शुभम शेळके, कार्याध्यक्ष धनंजय पाटील आणि सरचिटणीस मनोहर हुंदरे उपस्थित होते. सीमाप्रश्नाच्या ऐतिहासिक, कायदेशीर, सामाजिक आणि भविष्यातील रणनीतीसंदर्भात सविस्तर चर्चा झाली.

माजी आयएएस अधिकारी श्रीकांत देशपांडे यांनी महाराष्ट्र शासनाच्या सामान्य प्रशासन विभागाचे प्रधान सचिव आणि ‘सीमाप्रश्नाचे प्रधान सचिव’ (विशेष कक्ष) म्हणून महाराष्ट्र-कर्नाटक सीमावादावर अत्यंत महत्त्वपूर्ण आणि धोरणात्मक काम केले. त्यांच्या सोबत डॉ. दीपक पवार यांनी महाराष्ट्र शासनाच्या महाराष्ट्र-कर्नाटक सीमाप्रश्न कक्षाचे विशेष कार्य अधिकारी (OSD) म्हणून काम करताना सीमाभागातील मराठी भाषिक नागरिकांच्या प्रश्नांचा सखोल अभ्यास केला आहे. त्यांनी सीमावादाच्या कायदेशीर बाजू, राज्यघटनात्मक हक्क, भाषिक अस्मिता आणि सांस्कृतिक अस्तित्व या मुद्द्यांवर शासनाला महत्त्वपूर्ण मार्गदर्शन केले.

तसेच त्यांच्या ‘महाराष्ट्र-कर्नाटक सीमावाद : संघर्ष आणि संकल्प’ या संशोधनपर पुस्तकाचा आवर्जून उल्लेख केला पाहिजे. सीमालढ्याचा इतिहास, विविध टप्पे, न्यायालयीन प्रक्रिया, राजकीय घडामोडी आणि भविष्यातील दिशा यांचे दस्तऐवजीकरण करणाऱ्या या पुस्तकाला दक्षिण महाराष्ट्र साहित्य संघाचा ‘कृ. गो. सूर्यवंशी पुरस्कार’ (२०२१) प्राप्त झाला आहे.

बैठकीदरम्यान डॉ. पवार यांनी सीमालढ्याच्या गेल्या अनेक दशकांतील चळवळीचा आढावा घेताना इतिहासात झालेल्या राजकीय, संघटनात्मक आणि सामाजिक नुकसानीचे वस्तुनिष्ठ विश्लेषण मांडले. केवळ आंदोलनांच्या जोरावर सीमाप्रश्न सुटणार नाही, तर रचनात्मक विकास आणि संघर्ष या दोन्ही आघाड्यांवर एकाच वेळी काम करणे आवश्यक आहे, असे त्यांनी स्पष्ट केले.

बेळगाव, कारवार, निपाणी आणि इतर सीमाभागातील प्रत्यक्ष दौऱ्यांमधून मिळालेल्या अनुभवांची माहिती त्यांनी दिली. सीमाभागातील मराठी माणसाचा प्रश्न हा केवळ भूभागाचा नसून भाषिक अस्मिता, सांस्कृतिक हक्क आणि मानवाधिकारांचा प्रश्न आहे, असे त्यांनी सांगितले.

यावेळी युवासमितीच्या पदाधिकाऱ्यांनी डॉ. दीपक पवार यांच्यासारख्या अभ्यासू व्यक्तिमत्त्वाकडून सीमालढ्याच्या इतिहासाची, कायदेशीर प्रक्रियेची आणि भविष्यातील संघटनात्मक दिशेची मिळालेली माहिती युवा पिढीसाठी अत्यंत मार्गदर्शक ठरेल. सीमाभागातील मराठी समाजाच्या न्याय्य हक्कांसाठी संघर्ष अधिक अभ्यासपूर्ण आणि प्रभावी करण्यासाठी ही भेट महत्त्वपूर्ण ठरली आहे. सीमाभागातील युवकांनी भावनिक आंदोलनाबरोबरच अभ्यास, संघटन, कायदेशीर तयारी यांवर भर देणे आवश्यक असल्याचे मत व्यक्त केले.

बैठकीच्या शेवटी डॉ. दीपक पवार यांनी महाराष्ट्र एकीकरण युवा समिती सीमाभागच्या कार्याला शुभेच्छा देत, सीमालढ्याला दीर्घकालीन ताकद देण्यासाठी युवकांनी सातत्यपूर्ण आणि अभ्यासाधिष्ठित लढा उभारावा, असे आवाहन केले.

About Belgaum Varta

Check Also

तारांगण व विश्वभारत सेवा समितीचे दुसरे बालकवी संमेलन 18 ऑगस्टला

Spread the love  बेळगांव : तारांगण व विश्वभारत सेवा समितीच्या संयुक्त विद्यमाने दुसरे बालकवी संमेलन …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *