
बेळगाव : युनियन जिमखाना क्लबमधील गोळीबाराच्या घटनेनंतर प्रकरण चांगलेच तापले असताना न्यायालयाच्या निर्देशानुसार क्लबच्या पदाधिकाऱ्यांसह नऊ जणांविरुद्ध शुक्रवारी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यामुळे या प्रकरणाला नवे वळण मिळाले असून क्लबच्या कारभाराची पोलिसांकडून चौकशी होण्याची शक्यता आहे.
चंद्रकांत भरमानी भांडगी, संजय पोतदार, प्रसन्न विठ्ठलराव सुंठणकर, सुधाकर पाटणकर, संजय चव्हाण, संजय मोरे, रोहित पोरवाल, चेतन बैलूर आणि विठ्ठल गवस यांच्याविरुद्ध हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
काही दिवसांपूर्वी युनियन जिमखाना क्लबमध्ये गोळीबाराची घटना घडली होती. या घटनेप्रकरणी पोलिसांनी यापूर्वी दोन स्वतंत्र गुन्हे दाखल केले असून तपास सुरू आहे. आता न्यायालयाच्या आदेशानुसार दाखल झालेल्या या नव्या गुन्ह्यामुळे क्लबचे कामकाज, सुरक्षा व्यवस्था, सदस्य व इतर व्यक्तींना दिला जाणारा प्रवेश तसेच क्लबमध्ये सुरू असलेल्या कथित उपक्रमांची चौकशी होणार आहे.
राघवेंद्र कॉलनी, शहापूर येथील विठ्ठल नामदेव उपरी यांनी क्लबचे कामकाज अनधिकृतपणे सुरू असल्याचा आरोप करत न्यायालयात खासगी तक्रार दाखल केली होती. क्लबमध्ये सदस्यांव्यतिरिक्त इतर व्यक्तींना प्रवेश देऊन कायद्याच्या विरोधातील उपक्रम राबविले जात असल्याचा आरोपही तक्रारीत करण्यात आला होता.
२५ जानेवारी २०२५ रोजी दाखल करण्यात आलेल्या या तक्रारीची दखल घेत न्यायालयाने पोलिसांना गुन्हा नोंदविण्याचे निर्देश दिले. त्यानुसार पोलिसांनी कलम २२३ अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणाच्या तपासात क्लबच्या पदाधिकाऱ्यांची व संचालकांची भूमिका तपासली जाणार असून पुढील चौकशीत आणखी काही बाबी समोर येण्याची शक्यता आहे.
Belgaum Varta Belgaum Varta