
बेळगाव : खानापूर तालुक्यातील निडगल गावचे ग्रामदैवत आणि ‘सिद्धगुंढा’ म्हणून प्रसिद्ध असलेल्या ऐतिहासिक सिद्धेश्वर मंदिरात अज्ञात समाजकंटकांनी तोडफोड केल्याची घटना शनिवार, दि. ८ ऑगस्ट रोजी उघडकीस आली. मंदिरातील शिवलिंग, नंदी, कासव तसेच तुळशी वृंदावनाची नासधूस करण्यात आल्याने निडगलसह परिसरातील ग्रामस्थ आणि शिवभक्तांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे.
श्रावण महिन्याच्या पार्श्वभूमीवर मंदिरात भाविकांची वर्दळ वाढण्याची शक्यता असतानाच हा प्रकार घडल्याने धार्मिक स्थळांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. मंदिरातील पवित्र वस्तूंची तोडफोड नेमकी कोणी केली, याचा शोध घेऊन दोषींवर कठोर कारवाई करण्याची मागणी ग्रामस्थांनी केली आहे.
या घटनेमागे कोणाचा हात आहे, तसेच धार्मिक तेढ निर्माण करण्याचा जाणीवपूर्वक प्रयत्न झाला आहे का, या सर्व शक्यतांचा तपास पोलिसांनी करावा, अशी मागणीही करण्यात आली आहे.
घटनेनंतर निडगल ग्रामस्थांनी खानापूर पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली. पीआय एल. एच. गोवंडी यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली असून, तोडफोड करणाऱ्या अज्ञात व्यक्तींचा शोध घेण्यासाठी तपास सुरू केला आहे.
दरम्यान, मंदिराची सुरक्षा वाढवावी आणि दोषींना तातडीने अटक करून कठोर कायदेशीर कारवाई करावी, अशी मागणी ग्रामस्थ व शिवभक्तांकडून करण्यात येत आहे.
Belgaum Varta Belgaum Varta