
बेळगाव : मराठी विद्यानिकेतन शाळेच्या इयत्ता आठवीच्या विद्यार्थ्यांनी ८ ऑगस्ट रोजी माहेश्वरी अंधशाळेला भेट देऊन तेथील विशेष विद्यार्थ्यांच्या शिक्षणपद्धती, शिस्त, स्वावलंबन, आत्मविश्वास आणि जिद्दीचा प्रत्यक्ष अनुभव घेतला.
दृष्टी नसली तरी स्वप्नांना आणि कर्तृत्वाला कोणतीही मर्यादा नसते, याची जाणीव या भेटीदरम्यान विद्यार्थ्यांना झाली. माहेश्वरी अंधशाळेतील विद्यार्थ्यांशी संवाद साधताना मराठी विद्यानिकेतनच्या विद्यार्थ्यांनी विविध प्रश्न विचारून आपल्या शंकांचे निरसन करून घेतले.
विशेष विद्यार्थी प्रत्येक काम अत्यंत आत्मविश्वासाने आणि कौशल्याने करत असल्याचे पाहून मराठी विद्यानिकेतनच्या विद्यार्थ्यांना प्रेरणा मिळाली. त्यांच्या शिकण्याची तळमळ, मेहनत आणि जिद्द पाहिल्यानंतर आपल्या छोट्या-छोट्या कारणांबद्दल आणि तक्रारींबद्दल विद्यार्थ्यांना आत्मपरीक्षण करण्याची संधी मिळाली.
यावेळी माहेश्वरी अंधशाळेतील विद्यार्थ्यांनी संगणक हाताळण्याचे प्रात्यक्षिक सादवले. तसेच तबला आणि पेटीच्या साथीने गीत सादर करून पाहुण्या विद्यार्थ्यांचे स्वागत केले. हे विद्यार्थी क्रिकेट आणि बुद्धिबळ यांसारखे खेळही खेळतात. हे खेळ ते कशा पद्धतीने खेळतात, याची माहिती मराठी विद्यानिकेतनच्या विद्यार्थ्यांनी जाणून घेतली. तसेच अंध विद्यार्थ्यांची वाचन आणि लेखनाची पद्धत समजून घेत विविध प्रश्नांची उत्तरे मिळवली.
येत्या १५ ऑगस्टच्या स्वातंत्र्यदिनाच्या पार्श्वभूमीवर माहेश्वरी अंधशाळेतील विद्यार्थ्यांची पथसंचलनाची तयारीही विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष पाहता आली. या विशेष अभ्यासदौऱ्यास माहेश्वरी अंधशाळेच्या मुख्याध्यापिका अनिता गावडे यांचे विशेष सहकार्य लाभले.
या अभ्यासदौऱ्यासाठी मराठी विद्यानिकेतनचे माध्यमिक विभागाचे मुख्याध्यापक एन. सी. उडकेकर, प्राथमिक विभागाचे मुख्याध्यापक बी. जी. पाटील, शिक्षण संयोजिका नीला आपटे आणि सविता पवार यांचे प्रोत्साहन लाभले. शिक्षक माया पाटील, सरिता बांदेकर आणि महेश हगीदळे तसेच विद्यार्थ्यांनी अभ्यासदौरा यशस्वी करण्यासाठी विशेष परिश्रम घेतले.
Belgaum Varta Belgaum Varta