
बेळगाव : तब्बल १६० कोटी रुपयांच्या आर्थिक फसवणूक प्रकरणात सहभागी असल्याच्या आरोपावरून टिळकवाडी पोलिसांनी एका आरोपीला अटक केली आहे. अर्जुन महादेव वाघमारे (वय ३६, रा. मांगनूर, ता. चिक्कोडी) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, १३ जुलै २०२६ रोजी अशोक वीरुपाक्षी बिसगुप्पी (वय ४३, रा. कौजलगी, ता. गोकाक) यांनी टिळकवाडी पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली होती. तक्रारीनुसार, टिळकवाडी येथील मंगळवार पेठेतील रेणुका रेसिडेन्सी अपार्टमेंटच्या पहिल्या मजल्यावर APPEXX BIZCORP LLP नावाची ट्रेडिंग कंपनी चालविण्यात येत होती.
या कंपनीमार्फत तीन हजारांहून अधिक लोकांकडून सुमारे १६० कोटी रुपये गुंतवणुकीच्या स्वरूपात जमा करण्यात आल्याचा आरोप आहे. सदर रक्कम शेअर बाजार, रिअल इस्टेट तसेच विविध स्थावर मालमत्ता खरेदी करण्यासाठी वापरून गैरवापर करण्यात आल्याचे तक्रारीत नमूद आहे. तसेच नागरिकांना अधिक व्याज देण्याचे आमिष दाखवून त्यांची फसवणूक केल्याचा आरोपही करण्यात आला आहे.
या प्रकरणी टिळकवाडी पोलिस ठाण्यात गुन्हा क्रमांक ८५/२०२६ दाखल करण्यात आला असून, BUDS कायदा, KP ID कायदा तसेच भारतीय न्याय संहिता २०२३ मधील संबंधित कलमांनुसार कारवाई करण्यात आली आहे.
पोलिस आयुक्त, उपायुक्त (कायदा व सुव्यवस्था), उपायुक्त (गुन्हे व वाहतूक) आणि खडेबाजार विभागाचे सहाय्यक पोलिस आयुक्त यांच्या मार्गदर्शनाखाली टिळकवाडी पोलिस ठाण्याचे निरीक्षक परशुराम एस. पूजेरी यांच्या नेतृत्वाखालील पथकाने आरोपी अर्जुन वाघमारे याला अटक केली. त्याला बेंगळुरू येथील XCII Additional City Civil and Sessions Judge (CCH-93) न्यायालयासमोर हजर करण्यात आले.
या प्रकरणातील इतर आरोपींचा शोध सुरू असून, तपासासाठी टिळकवाडी पोलिस आणि तांत्रिक पथक कार्यरत आहे. कारवाई करणाऱ्या पोलिस पथकाचे पोलिस आयुक्तांनी कौतुक केले.

Belgaum Varta Belgaum Varta