
शेकडो कुटुंबीय केवायसी पासून दूरच ; प्रत्येक रेशन दुकानात सुविधा उपलब्ध
निपाणी (वार्ता) : शिधापत्रिकेवरील धान्य वितरण व्यवस्थेत पारदर्शकता आणण्यासह मृत, स्थलांतरित आणि अपात्र लाभार्थ्यांची नावे शिधापत्रिके तून वगळण्यासाठी अन्न व नागरी पुरवठा विभागाने ई-केवायसी प्रक्रिया अनिवार्य केली आहे. ई-केवायसीची मुदत संपलेल्या शिधापत्रिकांवरील सदस्यांना आता पुन्हा ओळख पडताळणी करावी लागणार असून ही प्रक्रिया पूर्ण न केल्यास संबंधित कुटुंबाचे रेशन बंद करण्यात येणार आहे. त्यामुळे रेशन दुकानात ई- केवायसी करण्यासाठी नागरिकांची गर्दी होऊ लागली आहे.
निपाणी तालुक्यात हजारो कुटुंब अद्याप ई-केवायसीच्या प्रतीक्षेत आहेत. मोठ्या संख्येने लाभार्थी अद्याप प्रक्रियेबाहेर असल्याने विभागाची चिंता वाढली आहे. बीपीएल, एपीएल, अंत्योदय अन्न योजनेतील लाभार्थ्यांसाठी ई-केवायसी बंधनकारक करण्यात आली आहे. शिधापत्रिकेवरील प्रत्येक सदस्याने स्वतः उपस्थित राहून बोटांचे ठसे अथवा ओटीपीच्या माध्यमातून ओळख पडताळणी करण्यात येत आहे. त्यासाठी कुटुंबातील सर्व सदस्यांची स्वतंत्र केवायसी करणे आवश्यक आहे.
निर्धारित कालावधीत ई-केवायसी पूर्ण न करणाऱ्या सदस्याचे नाव शिधापत्रिकेतून निष्क्रिय करण्यात येणार आहे. त्यामुळे संबंधित सदस्याला त्या महिन्याचे रेशन मिळणार नाही. त्यानंतर ई-केवायसी पूर्ण केल्यानंतरच संबंधित सदस्याचे नाव पुन्हा सक्रिय करण्यात येणार आहे. लाभार्थ्यांच्या सोयीसाठी रेशन वितरण दुकानांमध्ये ई-केवायसीची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे.
——————————————————————
‘शिधापत्रिकेवरील धान्याचा लाभ घेण्यासाठी कुटुंबातील प्रत्येक सदस्यांची ई -केवायसी करणे गरजेचे आहे. तसे न झाल्यास संबंधित कुटुंबातील रेशन बंद होणार आहे. त्यासाठी सर्वांनी ई केवायसी करून सहकार्य करावे.’
-अभिजीत गायकवाड, अन्न, आहार पुरवठा अधिकारी, निपाणी
Belgaum Varta Belgaum Varta