
मंगळवारी यात्रोत्सवाचा थाट; महाराष्ट्र-कर्नाटकातील हजारो भाविकांची मांदियाळी : श्रद्धेसोबत व्यापारालाही मिळणार उभारी
वडगाव : नवसाला पावणारी आणि वडगावची ग्रामदेवता म्हणून लौकिक असलेल्या श्री मंगाई देवीच्या वार्षिक यात्रेचा जल्लोष मंगळवार, दि. ११ ऑगस्ट रोजी रंगणार आहे. शेकडो वर्षांची परंपरा लाभलेल्या या यात्रेच्या निमित्ताने वडगाव परिसर भक्ती, उत्साह आणि आनंदाच्या वातावरणात न्हाऊन निघाला आहे. बेळगावसह महाराष्ट्र आणि कर्नाटकातील हजारो भाविकांची पावले मंगाई देवीच्या दर्शनासाठी वडगावकडे वळणार असल्याने यात्रेची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे.
गोरगरीब, कष्टकरी, कामगार, विणकर आणि सर्वसामान्यांच्या श्रद्धेचे स्थान असलेल्या मंगाई देवीच्या यात्रेला दरवर्षी मोठी परंपरा आणि धार्मिक महत्त्व लाभले आहे. यंदाच्या यात्रेसाठी वडगाववासीयांनी जय्यत तयारी केली असून, मंदिर परिसर आकर्षक विद्युत रोषणाई, फुलांची सजावट आणि स्वागत कमानींनी उजळून निघाला आहे.
‘गाऱ्हाणे’ उतरविण्याच्या विधीने यात्रेला प्रारंभ
मंगाई देवीच्या यात्रेतील पारंपरिक गाराणे घालणे आणि उतरविणे हा अत्यंत महत्त्वाचा धार्मिक विधी मानला जातो. दुष्काळ, रोगराई, संकटे आणि विविध अडचणींपासून मुक्तता मिळावी, यासाठी भाविक देवीसमोर गाराणे घालून आपल्या व्यथा मांडतात. परंपरेनुसार वारांची पाळवणूक पूर्ण झाल्यानंतर मंगळवारी दुपारी १२ वाजता श्री मंगाई देवी पंच कमिटीच्या वतीने गाराणे उतरविण्याचा विधी पार पडणार आहे. त्यानंतर मुख्य यात्रोत्सवाला प्रारंभ होईल.
गाऱ्हाणे उतरविल्यानंतर भाविकांकडून शिपळ वाढविणे, देवीची ओटी भरणे आणि नवसपूर्तीचे विविध धार्मिक विधी सुरू होतील. देवीच्या दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांना कोणतीही गैरसोय होऊ नये, यासाठी यात्रा कमिटीने आवश्यक नियोजन केले आहे.
नाथ पै सर्कलपासूनच यात्रेचा रंग
मंगाई यात्रेचा उत्साह केवळ मंदिरापुरता मर्यादित राहिलेला नाही. शहापूरच्या नाथ पै सर्कलपासूनच यात्रेचा रंग चढू लागला आहे. आकर्षक शुभेच्छा फलक, भव्य स्वागत कमानी, मिठाईची दुकाने आणि विद्युत रोषणाईने संपूर्ण मार्ग यात्रामय झाला आहे.
नाथ पै सर्कल ते मंगाई देवी मंदिर हा रस्ता जणू यात्रेच्या स्वागतासाठी सज्ज झाल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. मंदिर परिसरात विविध वस्तूंचे स्टॉल, खाद्यपदार्थांची दुकाने आणि मोठमोठे पाळणे उभारण्यात आल्याने परिसरात चैतन्य निर्माण झाले आहे. लहानांपासून ज्येष्ठांपर्यंत सर्वांनाच यात्रेची ओढ लागली आहे.
वाहतूक व्यवस्थेसाठी विशेष नियोजन
यात्रेदरम्यान होणारी प्रचंड गर्दी लक्षात घेऊन दुचाकी आणि चारचाकी वाहनांना मंदिर परिसरात प्रवेशबंदी करण्यात आली आहे. भाविकांची सुरक्षितता, वाहतूक कोंडी टाळणे आणि दर्शन व्यवस्था सुरळीत ठेवण्यासाठी पार्किंगसह अन्य आवश्यक नियोजन करण्यात आले आहे.
पावसाची विश्रांती; यात्रेचा उत्साह द्विगुणित
साधारणपणे जुलै महिन्यात होणारी ही यात्रा यंदा अधिक मासामुळे ऑगस्टमध्ये होत आहे. जुलैतील मुसळधार पावसातही भाविकांचा उत्साह कधीच कमी होत नाही. मात्र यंदा ऑगस्टमध्ये यात्रा असल्याने पावसाची विश्रांती मिळाल्यास यात्रेतील गर्दी आणि जल्लोष आणखी वाढण्याची शक्यता आहे.
श्रद्धेच्या यात्रेला अर्थकारणाची जोड
मंगाई यात्रा ही केवळ धार्मिक उत्सव नसून वडगावच्या सामाजिक आणि आर्थिक जीवनाला चालना देणारा मोठा उत्सव ठरतो. हजारो भाविकांच्या आगमनामुळे व्यापारी, दुकानदार, खाद्यपदार्थ विक्रेते, पाळणे, विविध स्टॉलधारक आणि छोट्या व्यावसायिकांची उलाढाल वाढणार आहे.
देवीच्या चरणी श्रद्धेची ओंजळ घेऊन येणाऱ्या हजारो भाविकांमुळे वडगावात भक्तीचा सागर उसळणार असून, त्याचबरोबर बाजारपेठेलाही यात्रेच्या निमित्ताने नवसंजीवनी मिळणार आहे. त्यामुळे यंदाची मंगाई यात्रा ‘श्रद्धेचा जागर आणि अर्थकारणाला आधार’ ठरणार आहे.

Belgaum Varta Belgaum Varta