Monday , August 17 2026
Breaking News

मार्कंडेय नदीच्या प्रवाहात तरुण वाहून गेला

Spread the love

 

बेळगाव : पोहण्यासाठी गेलेल्या २० वर्षीय तरुणाचा मार्कंडेय नदीच्या पाण्याच्या तीव्र प्रवाहात बुडून दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना रविवारी दुपारी कडाबगट्टी गावाच्या हद्दीत घडली. या घटनेने परिसरात हळहळ व्यक्त होत असून, मृत तरुणाच्या कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.

मळवंकी (ता. बेळगाव) येथील राहुल बसवराज कापसी (वय २०) असे मृत तरुणाचे नाव आहे. राहुल हा कडाबगट्टी गावाजवळील मार्कंडेय नदीत नियमितपणे पोहण्यासाठी जात असल्याची माहिती मिळाली आहे.

रविवारी दुपारीही तो नेहमीप्रमाणे घट्टी बसवण्णा मंदिर परिसरातील नदीपात्रात पोहण्यासाठी गेला होता. मात्र, पोहत असताना अचानक पाण्याच्या वेगवान प्रवाहाचा अंदाज न आल्याने तो प्रवाहात खेचला गेला. खोल पाण्यात गेल्याने त्याचा बुडून मृत्यू झाला.

घटनेची माहिती मिळताच स्थानिक नागरिकांनी मदतीसाठी धाव घेतली. दरम्यान, पोलिसांनी घटनास्थळी भेट देऊन घटनेची माहिती घेतली असून मृत्यूच्या नेमक्या परिस्थितीचा तपास सुरू केला आहे.

नदीपात्रातील पाण्याचा वाढलेला प्रवाह आणि खोल पाण्यामुळे हा अपघात झाल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त केला जात आहे. मात्र, राहुल नेमका कोणत्या परिस्थितीत पाण्यात बुडाला, याचे कारण पोलिसांच्या तपासानंतर स्पष्ट होणार आहे.

या घटनेमुळे नदीकाठी पोहण्यासाठी जाणाऱ्या नागरिकांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे.

About Belgaum Varta

Check Also

मंगळागौरीच्या पारंपरिक खेळांनी रंगला ‘सखी’चा सांस्कृतिक सोहळा

Spread the love  बेळगाव : महाराष्ट्राच्या समृद्ध लोकपरंपरेचा सुगंध, मंगळागौरीच्या खेळांचा उत्साह आणि महिलांच्या कलागुणांची …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *