Monday , September 7 2026
Breaking News

जेवढे ग्रेटफूल व्हाल तेवढे ग्रेट व्हाल : श्री प्रल्हाद वामनराव पै

Spread the love

 

 

बेळगाव : आयुष्यातील महत्वाच्या गोष्टींना वेळेवर वेळ द्या म्हणजे नंतर पच्छाताप करायची वेळ येणार नाही.कृतज्ञता हा जीवनाचा पाया आहे. त्यामुळे शाळा कॉलेज ही ज्ञान मंदिरे असून तेथील शिक्षक व प्रत्येक कर्मचाऱ्यांबद्धल विद्यार्थ्यांनी कृतज्ञ असल पाहिजे. अभ्यासात सातत्य हेच यशाचे गुपित असून विद्यार्थ्यांनी व्यसनापासून दूर राहून शरीरासाठी योग्य आहार व व्यायाम आणि मनासाठी कृतज्ञता व सर्वांच्या भल्याचे विचार केल्यास तुमचे भले झाल्या वाचून राहणार नाही असे मार्गदर्शन प्रल्हाद पै यांनी केले.
मराठा मंडळ संस्थेच्या जवळपास 1500 कॉलेज विद्यार्थ्यांसाठी आयोजित ‘यशस्वी व्हा’ या विद्यार्थी मार्गदर्शन पर कार्यक्रमामध्ये प्रल्हाद पै बोलत होते. आपल्याकडे जे कौशल्य आहे ते ओळखून त्या कौशल्याचा वापर समाजासाठी केल्यास समाजामध्ये आपण आपोआपच मोठे होतो. त्यामुळे कोणतेही क्षेत्र हे कमी नसून आपल्या आवडीचे जे क्षेत्र निवडून त्या क्षेत्रात टॉपला गेल्यास आपली प्रगती निश्चितच होते. पण यासाठी सातत्य आणि जे जे आपल्याला सहाय्यक आहेत मग ती व्यक्ती असो की वस्तू त्या सर्वांची कृतज्ञता मनापासून व्यक्त करत गेल्यास कृतज्ञतेमुळे आपली व्यवस्था होते आणि यशाचा मार्ग सुकर होतो.
कष्ट केल्याशिवाय कोणतीही गोष्ट मिळत नसून अपयश आलं तर खचून न जाता अपयशाची कारणे शोधनं महत्वाचं आहे.यश हे एका दिवसात मिळतं नसून त्यासाठी सातत्याने प्रामाणिक प्रयत्न केले पाहिजे. यशस्वी होणं ही निरंतर चालणारी प्रक्रिया आहे.केळ्याच्या सालीवरून आपण घसरून पडल्यानंतर आपण तिथेच बसून रहात नाही अगदी तसंच आपण अपयशी झाल्यास पुन्हा आपल्याला उठून जोमाने कामाला लागायचं असतं.
अपयश येण्याची महत्वाची दोन कारणे आहेत. आवश्यक तेवढे प्रयत्न न करणे किंवा योग्य दिशेने प्रयत्न न करणे हे होय.प्रल्हाद पै म्हणाले की आपली स्पर्धा ही आपल्याशीच असली पाहिजे जेणेकरून ताण व निराशा येणार नाही.रोज थोडी थोडी प्रगती करणे हा यशाच्या जवळ जाण्याचा राजमार्ग आहे. सदगुरु वामनराव पै म्हणतात की ‘ग्रेटफुल हार्ट इज अल्वेज नेक्स्ट टू गॉड’ त्यामुळे आपण जेवढे कृतज्ञ राहू तितके आपले मन मजबूत असेल आणि असे मजबूत मन आपल्याला योग्य दिशा दाखवून सर्व काही देण्यास समर्थ असतें असे ते म्हणाले.
व्यासपीठावर श्री प्रल्हाद पै, कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मराठा मंडळ संस्थेचे दिनकर ओऊळकर,जीवनविद्या मिशनचे विश्वस्त पंकज नाईक उपस्थित होते.कार्यक्रमाची सुरवात विश्वप्रार्थना व छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेस हारार्पण करून करण्यात आली. त्यानंतर मराठा मंडळ संस्थेचे उपाध्यक्ष राजेश हलगेकर यांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली.मराठा मंडळ संस्थेच्या वतीने प्रल्हाद पै यांचा स्मृतिचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सौ. सुरेखा कामूले व डॉ. वृषाली कदम यांनी केले तर आभार मधुरा शिरोडकर यांनी मांडले. कार्यक्रमाला मराठा मंडळ संस्थेच्या विविध कॉलेजचे प्रिन्सिपॉल, संचालक,विद्यार्थी, इतर स्टाफ व जीवनविद्या मिशनचे पदाधिकारी, कार्यकर्ते मोठया संख्येने उपस्थित होते.

About Belgaum Varta

Check Also

मराठी विद्यानिकेतनमध्ये शिक्षक दिन साजरा

Spread the love  बेळगाव : मराठी विद्यानिकेतनमध्ये शिक्षक दिन साजरा करण्यात आला. शाळेतील इंग्रजी विषयाच्या …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *