






बेळगाव : आपल्यासह एम. बी. पाटील यांना उपमुख्यमंत्रीपद देण्याबाबत काँग्रेस पक्षात चर्चा झाल्याचे खरे आहे. मात्र, याबाबत अंतिम निर्णय पक्षाचे हायकमांड घेईल. योग्य वेळ आणि परिस्थिती आल्यानंतर याबाबत बोलले जाईल, असे सार्वजनिक बांधकाम मंत्री सतीश जारकीहोळी यांनी सांगितले.
बेळगाव शहरात मंगळवारी पत्रकारांशी बोलताना जारकीहोळी म्हणाले की, पक्षाच्या हिताच्या दृष्टीने उपमुख्यमंत्रीपदाबाबत चर्चा झाली होती. मात्र, आम्ही कोणतीही मागणी केलेली नाही. पक्षानेच आमची दखल घेऊन निर्णय घ्यावा. यासाठी कोणत्याही प्रकारचा दबाव आणला जाणार नाही.
१३ तारखेपर्यंत नव्या मंत्र्यांना खातेवाटप
राज्य मंत्रिमंडळात नव्याने समाविष्ट झालेल्या १९ मंत्र्यांना येत्या १३ तारखेपर्यंत खातेवाटप पूर्ण होण्याची शक्यता आहे. विधानसभा अधिवेशन दोन दिवसांत सुरू होत असून, त्यापूर्वी नव्या मंत्र्यांना खात्यांची जबाबदारी दिली जाईल, असे त्यांनी स्पष्ट केले.
आपल्या खात्यात बदल होणार असल्याच्या चर्चेबाबत जारकीहोळी म्हणाले की, खातेबदलाबाबत कोणतीही चर्चा झालेली नाही. आपणही कोणतेही खाते मागितलेले नाही. पक्ष नेतृत्व जो निर्णय घेईल, तो मान्य असेल. सध्या आपण सार्वजनिक बांधकाम विभागाची जबाबदारी सांभाळत असून, यापुढेही त्याच विभागात काम सुरू ठेवणार असल्याचे त्यांनी सांगितले.
सत्तारूढ पक्षात महिलांना आणखी एक मंत्रिपद
मंत्रिमंडळातील आणखी एक जागा महिलेसाठी राखीव ठेवण्यात येणार असल्याचे हायकमांडने स्पष्ट केले आहे. मात्र, हे मंत्रिपद कोणाला मिळणार, हे आगामी काळात स्पष्ट होईल, असे जारकीहोळी यांनी सांगितले.
साकव व पुलांची कामे लवकरच सुरू
राज्यात ज्या ठिकाणी पुलांची आवश्यकता आहे, त्या ठिकाणी कामे हाती घेण्यात आली आहेत. अनेक कामांसाठी निविदा प्रक्रिया पूर्ण झाली असून, लवकरच प्रत्यक्ष कामांना सुरुवात होईल. खानापूर तसेच उगार खुर्दकडून येताना परमानंदवाडी येथे पुलाचे काम सुरू असल्याची माहिती त्यांनी दिली.
बेळगाव जिल्ह्यात तीन तालुके दुष्काळग्रस्त
राज्य सरकार दुष्काळाकडे दुर्लक्ष करत असल्याचा भाजपचा आरोप त्यांनी फेटाळून लावला. दुष्काळी परिस्थितीचा सरकार गांभीर्याने आढावा घेत आहे. बेळगाव जिल्ह्यात यरगट्टी, सौंदत्ती आणि रामदुर्ग या तीन तालुक्यांना दुष्काळग्रस्त तालुके म्हणून घोषित करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.
सिद्धरामय्यांशी कोणतेही मतभेद नाहीत
माजी मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांच्याशी कोणतेही मतभेद नसल्याचे जारकीहोळी यांनी स्पष्ट केले. “आम्ही पूर्वीही एकत्र होतो आणि पुढेही एकत्र राहू. सिद्धरामय्या सत्तेत असोत किंवा नसोत, ते आमचे नेते आहेत. आमच्यात नाराजी असल्याच्या बातम्या काल्पनिक आहेत,” असे ते म्हणाले. २०२८ची विधानसभा निवडणूक सिद्धरामय्यांच्या नेतृत्वाखालीच होईल, असेही त्यांनी सांगितले.
नागेंद्र यांना पुन्हा मंत्रिपद देण्यात गैर नाही
बी. नागेंद्र यांना पुन्हा मंत्रिपद देण्यात काहीही गैर नसल्याचेही जारकीहोळी म्हणाले. लोकायुक्त आणि एसआयटीकडून क्लीन चिट मिळाल्यानंतर हायकमांडने विचारपूर्वक त्यांना मंत्रिपद दिले आहे. त्यामुळे त्यांना पुन्हा मंत्रिपदावरून हटविण्याचा प्रश्नच उद्भवत नाही, असे त्यांनी स्पष्ट केले.
दरम्यान, जिल्ह्यातील पर्यटनस्थळांच्या विकासासाठी आगामी काळात अधिकाऱ्यांसोबत प्रत्यक्ष पाहणी दौरे करून आवश्यक उपाययोजना करण्यात येतील, असेही त्यांनी सांगितले.

Belgaum Varta Belgaum Varta