Sunday , August 16 2026
Breaking News

शिवानंद नीलण्णवर यांच्यावर ईडीची धाड; १,७७७ कोटींच्या रकमेचा अद्याप ठावठिकाणा नाही

Spread the love

 

बेळगाव : ठेवीदारांना अधिक व्याजाचे आमिष दाखवून हजारो कोटी रुपयांची फसवणूक केल्याचा आरोप असलेल्या शिवम असोसिएट्सचे मालक शिवानंद नीलण्णवर यांच्यावर अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) केलेल्या छापेमारीनंतर धक्कादायक माहिती समोर आली आहे. नीलण्णवर यांनी गुंतवणूकदारांकडून सुमारे २,११०.९७ कोटी रुपये जमा केल्याचे तपासात निष्पन्न झाले असून, त्यापैकी ३३३.८९ कोटी रुपये गुंतवणूकदारांना परत करण्यात आले आहेत. मात्र, उर्वरित १,७७७.०८ कोटी रुपयांच्या कथित गुन्ह्यातील रकमेचा अद्याप ठावठिकाणा लागलेला नाही, अशी माहिती ईडीने प्रसिद्ध केलेल्या निवेदनात दिली आहे.

ईडीच्या मंगळूर येथील अधिकाऱ्यांच्या पथकाने ७ ऑगस्ट रोजी बेळगाव, चिक्कोडी आणि निपाणी परिसरातील विविध ठिकाणी एकाच वेळी छापेमारी केली होती. या कारवाईत आर्थिक व्यवहारांशी संबंधित महत्त्वाची कागदपत्रे तसेच डिजिटल पुरावे जप्त करण्यात आले आहेत. मनी लाँडरिंग प्रतिबंधक कायद्यांतर्गत (PMLA) ही कारवाई करण्यात आली.

माळमारुती पोलीस ठाण्यात बीयूडीएस (BUDS) कायदा आणि कर्नाटक ठेवीदारांच्या हितसंरक्षण कायदा-२००४ अंतर्गत दाखल एफआयआरच्या आधारे ईडीने मनी लाँडरिंगचा तपास सुरू केला आहे.

महिन्याला ३ टक्के परताव्याचे आमिष

तपासानुसार, शिवानंद नीलण्णवर यांनी गुंतवणूकदारांना दरमहा ३ टक्के नफा देण्याचे आश्वासन देत मोठ्या प्रमाणात निधी जमा केला. या माध्यमातून सुमारे २,११०.९७ कोटी रुपये गोळा करण्यात आल्याचे ईडीच्या तपासात समोर आले आहे.

गुंतवणूकदारांना पैसे गुंतवण्यासाठी प्रवृत्त करणाऱ्या कमिशन एजंट्स आणि मध्यस्थांना ०.५ टक्के कमिशन दिले जात असल्याचेही तपासात उघड झाले आहे.

विविध खात्यांमधून पैशांची उलाढाल

सार्वजनिकांकडून जमा केलेली रक्कम विविध व्यावसायिक, वैयक्तिक आणि मध्यस्थांच्या बँक खात्यांमधून वळवण्यात आल्याचे तपासात आढळले आहे. तसेच शेअर दलाल, फिक्स्ड डिपॉझिट खाती, नातेवाईक आणि इतर लाभार्थी यांच्या खात्यांमध्येही मोठ्या प्रमाणात पैसे हस्तांतरित झाल्याचे ईडीने म्हटले आहे.

अनेक संस्था आणि व्यक्तींमध्ये आर्थिक संबंध

शिवम असोसिएट्स, शिवानंद नीलण्णवर, सुभाष रामगौड नंदर्गी, महेश एस. नीलण्णवर, शिवम प्रॉडक्शन्स, शिवम लाइफलाइन प्रायव्हेट लिमिटेड आणि शिवम सेवा (ओपीसी) प्रायव्हेट लिमिटेड यांच्यासह अनेक व्यक्ती व संस्थांमध्ये आर्थिक संबंध असल्याचे तपासात आढळले आहे.

बँक खाती आणि आर्थिक कागदपत्रांच्या विश्लेषणातून या व्यक्ती व संस्थांमध्ये परस्पर संबंधित पद्धतीने मोठ्या प्रमाणात निधीची उलाढाल झाल्याचे समोर आले आहे.

कागदपत्रे व डिजिटल पुरावे जप्त

छापेमारीदरम्यान कथित गुन्ह्यातील पैशांची निर्मिती, त्यांचे हस्तांतरण, विविध टप्प्यांवर पैसे लपविणे तसेच अन्य ठिकाणी गुंतवणूक केल्याशी संबंधित कागदपत्रे आणि डिजिटल पुरावे ईडीने जप्त केले आहेत.

आर्थिक व्यवहार, निधीचे अन्यत्र हस्तांतरण, स्थावर मालमत्तेत केलेली गुंतवणूक तसेच आरोपींशी संबंधित व्यक्ती व संस्थांमधील व्यवहारांची कागदपत्रेही अधिकाऱ्यांच्या हाती लागली आहेत. जप्त कागदपत्रे आणि डिजिटल पुराव्यांची तपासणी सुरू असल्याचे ईडीने स्पष्ट केले आहे.

About Belgaum Varta

Check Also

मंगळागौरीच्या पारंपरिक खेळांनी रंगला ‘सखी’चा सांस्कृतिक सोहळा

Spread the love  बेळगाव : महाराष्ट्राच्या समृद्ध लोकपरंपरेचा सुगंध, मंगळागौरीच्या खेळांचा उत्साह आणि महिलांच्या कलागुणांची …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *