Sunday , August 16 2026
Breaking News

बेळगाव विभागातील ८३१ शिक्षक भरतीत मराठी माध्यमाला डावलल्याचा आरोप; मराठी भाषिकांत तीव्र नाराजी

Spread the love

 

बेळगाव : कर्नाटक सरकारने बेळगाव विभागासाठी जाहीर केलेल्या ८३१ शिक्षकांच्या भरती प्रक्रियेत केवळ कन्नड माध्यमासाठीच शिक्षकांची भरती करण्यात येत असल्याचा आरोप करण्यात आला असून, या अधिसूचनेत मराठी, उर्दू तसेच इतर अल्पसंख्याक माध्यमांसाठी शिक्षक भरतीचा कोणताही उल्लेख नसल्याने मराठी भाषिकांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत आहे.

या संदर्भात महाराष्ट्र एकीकरण युवा समिती सीमाभागचे युवा नेते शुभम शेळके यांनी सहकाऱ्यांसह जिल्हा शिक्षण अधिकारी (DDPI) कार्यालयाला भेट देऊन माहिती घेतली. जिल्हा शिक्षण अधिकारी कार्यालयात उपस्थित नसल्याने त्यांनी कार्यालय अधीक्षक सलीम नदाफ यांची भेट घेतली. सदर भरती अधिसूचना सध्या केवळ कन्नड माध्यमासाठी असल्याची माहिती नदाफ यांनी दिल्याचे शेळके यांनी सांगितले.

शुभम शेळके यांनी यावेळी प्रतिक्रिया देताना सांगितले की, मराठी माध्यमातील शिक्षक भरतीकडे वारंवार दुर्लक्ष झाल्यास मराठी विद्यार्थ्यांचे मोठ्या प्रमाणात शैक्षणिक नुकसान होण्याची शक्यता आहे. मराठीसह उर्दू आणि इतर अल्पसंख्याक भाषिक विद्यार्थ्यांनाही त्याचा गंभीर फटका बसू शकतो, अशी चिंता त्यांनी व्यक्त केली.

या प्रकरणी बंगळुरूहून डीडीपीआयचे वरिष्ठ अधिकारी बेळगावात येणार असून, त्यांच्याशी सविस्तर चर्चा करून निवेदन सादर करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. शिक्षक भरतीची अधिसूचना तातडीने दुरुस्त करून मराठी, उर्दू आणि इतर माध्यमांसाठीही शिक्षकांच्या जागा उपलब्ध करून द्याव्यात, अशी प्रमुख मागणी करण्यात येणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

दरम्यान, या मागणीसाठी उद्या सकाळी ठीक ११ वाजता जिल्हा शिक्षण अधिकारी कार्यालयात शिक्षणप्रेमी, पालक, शिक्षक आणि मराठी भाषिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन शुभम शेळके यांनी केले आहे.

प्रमुख मागण्या

• ८३१ शिक्षक भरती अधिसूचना तातडीने दुरुस्त करावी.
• मराठी व इतर माध्यमासाठी स्वतंत्र शिक्षक पदांचा समावेश करावा.
• सर्व भाषिक विद्यार्थ्यांना संविधानानुसार समान शैक्षणिक संधी उपलब्ध करून द्याव्यात.

 

About Belgaum Varta

Check Also

शांतीनगर टिळकवाडी येथे स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा

Spread the love  बेळगाव : टिळकवाडी शांतीनगर, स्वातंत्र्यवीर सावरकर उद्यान येथे ८० वा भारतीय स्वातंत्र्यदिन …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *