

बेळगाव : गणेशोत्सवादरम्यान डीजे वापरण्यास कोणतीही परवानगी दिली जाणार नाही. सर्वांनी सौहार्दपूर्ण वातावरणात गणेशोत्सव साजरा करावा, असे आवाहन शहर पोलीस आयुक्त भूषण बोरसे यांनी केले.
गुरुवारी कुमार गंधर्व कला मंदिर येथे आयोजित गणेशोत्सव पूर्वतयारी बैठकीत ते बोलत होते. मागील वर्षीही गणेशोत्सवादरम्यान डीजेला परवानगी देण्यात आली नव्हती. या निर्णयाचे ज्येष्ठ नागरिकांनी कौतुक केले होते, असे बोरसे यांनी सांगितले.
बेळगाव शहरातील सार्वजनिक गणेशमूर्तींसाठी १२ फूट उंचीची मर्यादा ठेवण्यात आली आहे. मंडपाची रचना अनावश्यकपणे मोठी करू नये, असेही त्यांनी स्पष्ट केले. मोठ्या मूर्तींच्या ठिकाणी विसर्जन सुलभ होण्यासाठी हुकची व्यवस्था करणे बंधनकारक राहणार असून, गणेश मंडळांनी मूर्तिकारांना त्याबाबत सूचना द्याव्यात, असे आवाहन त्यांनी केले.
बेळगाव शहराची लोकसंख्या सुमारे १४ लाख असून, गणेशोत्सव असो वा नसो, पोलिसांना बंदोबस्त आणि वाहतूक नियंत्रणाची जबाबदारी पार पाडावी लागते. त्यामुळे गणेश मंडळांनी पोलिसांना सहकार्य करावे, असे बोरसे म्हणाले.
गणेशोत्सवाच्या काळात प्रत्येक मंडळाच्या ठिकाणी एक कर्मचारी नियुक्त करण्यात येणार आहे. तसेच प्रत्येक मंडपात सीसीटीव्ही कॅमेरे बसवणे बंधनकारक करण्यात आले आहे. यामुळे चेन स्नॅचिंग आणि पाकीटमारीसारख्या घटना रोखण्यास मदत होईल.
गणेश मंडळांनी अश्लील गाणी वाजवू नयेत. तसेच रात्री १० नंतर कोणत्याही प्रकारचा ध्वनी करू नये, अशा स्पष्ट सूचना पोलीस आयुक्तांनी दिल्या. गणेश मंडळांनी या सर्व नियमांचे काटेकोरपणे पालन करावे, असेही त्यांनी सांगितले.

Belgaum Varta Belgaum Varta