Sunday , August 16 2026
Breaking News

जिल्हा क्रीडांगणावर उद्या स्वातंत्र्यदिनाचा जल्लोष

Spread the love

 

मंत्री, खासदार, आमदारांची उपस्थिती; सकाळी ध्वजारोहण, सायंकाळी विद्यार्थ्यांच्या सांस्कृतिक कार्यक्रमांची मेजवानी

बेळगाव : देशाचा ८० वा स्वातंत्र्यदिन जिल्हा प्रशासनातर्फे शनिवार, दि. १५ ऑगस्ट रोजी नेहरूनगर येथील जिल्हा क्रीडांगणावर उत्साहात साजरा करण्यात येणार आहे. स्वातंत्र्यदिनाच्या मुख्य शासकीय कार्यक्रमाची जय्यत तयारी प्रशासनाकडून करण्यात आली असून, विविध मान्यवरांची उपस्थिती राहणार आहे.

कार्यक्रमाला सकाळी ८.५५ वाजता प्रमुख अतिथींचे आगमन होईल. त्यानंतर सकाळी ९ वाजता सार्वजनिक बांधकाम मंत्री सतीश जारकीहोळी यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात येणार आहे. सकाळी ९.०५ वाजता सशस्त्र दलाकडून मानवंदना स्वीकारल्यानंतर मंत्री जारकीहोळी स्वातंत्र्यदिनाचा संदेश देणार आहेत.

मान्यवरांची मांदियाळी

स्वातंत्र्यदिनाच्या मुख्य कार्यक्रमाला सहकार मंत्री लक्ष्मण सवदी, विधानसभेचे मुख्य सचेतक अशोक पट्टण, राज्य सरकारचे दिल्ली विशेष प्रतिनिधी प्रकाश हुक्केरी, वायव्य कर्नाटक परिवहन महामंडळाचे अध्यक्ष भरमगौडा कागे, राज्य वित्त संस्थेचे अध्यक्ष कौजलगी, खासदार जगदीश शेट्टर, खासदार प्रियंका जारकीहोळी आणि खासदार विश्वेश्वर हेगडे-कागेरी यांच्यासह जिल्ह्यातील सर्व आमदार उपस्थित राहणार आहेत.

सायंकाळी विद्यार्थ्यांचा सांस्कृतिक जल्लोष

दरम्यान, स्वातंत्र्यदिनानिमित्त सायंकाळी ५ वाजता कुमार गंधर्व कला मंदिरात शालेय विद्यार्थ्यांच्या सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. देशभक्तीपर गीत, नृत्य, विविध सांस्कृतिक सादरीकरणातून विद्यार्थी स्वातंत्र्यदिनाचा उत्साह द्विगुणित करणार आहेत.

स्वातंत्र्यदिनाचा मुख्य शासकीय सोहळा आणि विद्यार्थ्यांच्या सांस्कृतिक कार्यक्रमासाठी प्रशासनाने व्यापक तयारी केली असून, नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून स्वातंत्र्यदिनाच्या उत्सवात सहभागी व्हावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

About Belgaum Varta

Check Also

मंगळागौरीच्या पारंपरिक खेळांनी रंगला ‘सखी’चा सांस्कृतिक सोहळा

Spread the love  बेळगाव : महाराष्ट्राच्या समृद्ध लोकपरंपरेचा सुगंध, मंगळागौरीच्या खेळांचा उत्साह आणि महिलांच्या कलागुणांची …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *