
बेळगाव : बेळगाव शहरातील गृहज्योती योजनेच्या पुनर्तपासणीचे काम पूर्ण करण्यासाठी हेस्कॉमतर्फे २४ ते ३१ ऑगस्टदरम्यान विशेष कॅम्पचे आयोजन करण्यात आले आहे. गृहज्योती योजनेसाठी कर्मचाऱ्यांनी यापूर्वी घरोघरी जाऊन नोंदणी व कागदपत्रांची तपासणी केली होती. मात्र, काही घरांमध्ये घरमालकांची भेट न झाल्याने पुनर्तपासणीचे काम अद्याप अपूर्ण आहे. त्यामुळे संबंधित ग्राहकांना ही प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी विशेष कॅम्पची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे.
शहराच्या दक्षिण भागातील शहापूर, वडगाव, टिळकवाडी, अनगोळ, भाग्यनगर, हिंदवाडी, मजगाव, ब्रह्मनगर, उद्यमबाग, राणी चन्नम्मानगर आणि काँग्रेस रोड परिसरातील ग्राहकांसाठी सहा ठिकाणी कॅम्प घेण्यात येणार आहेत.
यामध्ये रेल्वे स्टेशनसमोरील हेस्कॉम उपविभाग कार्यालय क्रमांक २, शहापूर पोलीस स्टेशनसमोरील हेस्कॉम तक्रार निवारण केंद्र, भाग्यनगर सहावा क्रॉस येथील पोलीस चौकी, गोवावेस येथील हेस्कॉम कार्यालय, शांतीनगर टिळकवाडी येथील दत्त मंदिर आणि उद्यमबाग येथील हेस्कॉम कार्यालय येथे गृहज्योती योजनेची पुनर्तपासणी करण्यात येणार आहे.
गृहज्योती योजनेच्या पुनर्तपासणीचे काम अद्याप बाकी असलेल्या ग्राहकांनी आवश्यक कागदपत्रांसह संबंधित कॅम्पला भेट देऊन पुनर्तपासणी प्रक्रिया पूर्ण करावी, असे आवाहन हेस्कॉमतर्फे करण्यात आले आहे. नागरिकांनी या संधीचा लाभ घेऊन आपली नोंदणी व पुनर्तपासणीचे काम वेळेत पूर्ण करावे, असेही आवाहन करण्यात आले आहे.

Belgaum Varta Belgaum Varta