Wednesday , August 26 2026
Breaking News

श्री चांगळेश्वरी देवीचा श्रावण मासातील अभिषेक सोहळा भक्तिभावात आणि उत्साहात

Spread the love

 

येळ्ळूर : श्रावण मासाच्या पवित्र पर्वानिमित्त येळ्ळूर ग्रामदेवता श्री चांगळेश्वरी देवीचा वार्षिक अभिषेक सोहळा मंगळवार, दिनांक २५ ऑगस्ट २०२६ रोजी अत्यंत भक्तिमय, मंगलमय आणि उत्साही वातावरणात पार पडला. श्री चांगळेश्वरी अभिषेक मंडळ व श्री चांगळेश्वरी युवक मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने गेल्या २४ वर्षांपासून ही धार्मिक परंपरा अखंडपणे जपली जात आहे.

श्रावण मासातील पवित्र दिवसाचे औचित्य साधून सकाळपासूनच मंदिर परिसरात भाविकांची मोठी गर्दी झाली होती. सवाद्य मिरवणुकीच्या माध्यमातून गावातील विविध मंदिरांना भेट देत महिलांनी डोक्यावर मंगल कलश घेऊन जलार्पण केले. टाळ-मृदुंगाचा गजर, भक्तिगीते आणि ‘श्री चांगळेश्वरी मातेचा विजय असो’ या जयघोषाने संपूर्ण परिसर भक्तिमय झाला.

त्यानंतर श्री चांगळेश्वरी देवीच्या मूर्तीवर विविध सुवासिक द्रव्ये, पवित्र जल आणि धार्मिक विधीनुसार अभिषेक करण्यात आला. अभिषेकानंतर देवीची आकर्षक अलंकार पूजा करण्यात आली. विविध फुलांनी व अलंकारांनी सजविलेल्या देवीचे मनोहारी रूप भाविकांचे विशेष आकर्षण ठरले. विधिवत पूजा-अर्चेनंतर महाआरती संपन्न झाली.

यावेळी गावाची सुख-समृद्धी, शांतता, सर्व ग्रामस्थांचे उत्तम आरोग्य आणि सर्वांगीण कल्याण यासाठी विशेष प्रार्थना व संकल्प करण्यात आला. महाआरतीनंतर टाळ-मृदुंगाच्या अखंड गजरात तसेच श्री चांगळेश्वरी मातेच्या जयघोषात परिसरातील शेकडो भाविकांनी देवीचे दर्शन घेतले.

सोहळ्यानंतर उपस्थित भाविकांना तीर्थ व प्रसादाचे वाटप करण्यात आले. संपूर्ण कार्यक्रमात भक्ती, श्रद्धा आणि उत्साहाचे वातावरण अनुभवायला मिळाले.

गेल्या २४ वर्षांपासून सुरू असलेली ही धार्मिक परंपरा यापुढेही अखंड सुरू ठेवण्याचा निर्धार मंडळाच्या पदाधिकाऱ्यांनी व ग्रामस्थांनी व्यक्त केला. सोहळा यशस्वी करण्यासाठी श्री चांगळेश्वरी अभिषेक मंडळ, श्री चांगळेश्वरी युवक मंडळाचे पदाधिकारी, कार्यकर्ते तसेच येळ्ळूरमधील महिला, युवक आणि ग्रामस्थांनी विशेष परिश्रम घेतले.

श्रावणातील या भक्तिमय सोहळ्यामुळे संपूर्ण येळ्ळूर गावात धार्मिक आणि उत्सवी वातावरण निर्माण झाले होते.

About Belgaum Varta

Check Also

डूडलीफाय घेऊन आले मुलांच्या कल्पकतेला रंग देणारी आनंदाची पर्वणी

Spread the love  मुलांच्या कृतीशीलतेला वाव मिळावा, त्यांच्या कल्पनाशक्तीला नवी दिशा मिळावी आणि त्यांच्या कल्पना …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *