

बेळगाव : बेळगाव शहरी विकास प्राधिकरणाचे (BUDA) नूतन अध्यक्ष आसिफ सेठ त यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या पहिल्याच बैठकीत शहराच्या विकासाला चालना देणारे अनेक महत्त्वपूर्ण प्रस्ताव मंजूर करण्यात आले. यामध्ये कणबर्गी येथे आयटी पार्कसाठी २४ एकर जमीन राखीव ठेवण्यासह १०० बेडचे रुग्णालय, महिलांसाठी जिम, कल्याण सभागृह, व्यावसायिक संकुल तसेच तलाव विकासाच्या कामांचा समावेश आहे.
कणबर्गी येथे आयटी पार्कसाठी २४ एकर जमीन
बेळगावात आयटी क्षेत्राला चालना देण्यासाठी कणबर्गी येथे २४ एकर जमीन आयटी पार्कसाठी राखीव ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला. हा आयटी पार्क तीन टप्प्यांत विकसित करण्याचा प्रस्ताव असून, यामुळे शहरात आयटी क्षेत्रासाठी स्वतंत्र पायाभूत सुविधा निर्माण होण्यास मदत होणार आहे. आयटी पार्क उभारणीसाठी आसिफ सेठ यांच्याकडून यापूर्वीही पाठपुरावा करण्यात आला होता.
कुमारस्वामी लेआउटमध्ये १०० बेडचे रुग्णालय
कुमारस्वामी लेआउट येथे १८ गुंठे जागेवर १०० बेडचे रुग्णालय उभारण्याच्या प्रस्तावालाही मंजुरी देण्यात आली. या प्रकल्पासाठी अंदाजे २५ कोटी रुपये खर्च अपेक्षित आहे. या रुग्णालयामुळे परिसरातील नागरिकांना आरोग्य सुविधा उपलब्ध होण्यास मदत होणार आहे.
रामतीर्थनगरमध्ये कल्याण सभागृह व व्यावसायिक संकुल
रामतीर्थनगर येथे कल्याण सभागृह आणि व्यावसायिक संकुल उभारण्यास मंजुरी देण्यात आली असून, या प्रकल्पासाठी सुमारे ३ कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. या सुविधेमुळे नागरिकांना सामाजिक आणि सार्वजनिक कार्यक्रमांसाठी जागा उपलब्ध होणार आहे.
दोन तलावांच्या विकासासाठी ११ कोटी
शहरातील जलस्रोतांच्या विकासावरही बुडाने भर दिला आहे. सह्याद्रीनगर आणि मुद्देनट्टी येथील दोन तलावांच्या विकासासाठी ११ कोटी रुपये खर्च करण्याचा निर्णय घेण्यात आला. तलावांचे सुशोभीकरण, पुनरुज्जीवन आणि परिसराचा विकास यामुळे नागरिकांना सुविधा मिळण्याची अपेक्षा आहे.
महिलांसाठी तीन जिम उभारणार
बेळगाव शहरातील विविध ठिकाणी महिलांसाठी तीन जिम उभारण्याचा प्रस्तावही मंजूर करण्यात आला. यासाठी ३ कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. महिलांना व्यायाम व आरोग्याच्या सुविधा उपलब्ध करून देणे हा या उपक्रमाचा उद्देश आहे.
बुडाच्या पहिल्याच बैठकीत मंजूर झालेल्या या प्रस्तावांमुळे रोजगारनिर्मिती, आरोग्य सुविधा, सार्वजनिक सोयी, महिलांसाठी सुविधा आणि पर्यावरणपूरक तलाव विकास अशा विविध क्षेत्रांना चालना मिळणार आहे. विशेषतः कणबर्गी येथील २४ एकर जमीन आयटी पार्कसाठी राखीव ठेवण्याचा निर्णय हा बेळगावच्या आयटी क्षेत्राच्या विकासाच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण टप्पा मानला जात आहे.

Belgaum Varta Belgaum Varta