Sunday , August 30 2026
Breaking News

‘भारतात मुस्लिम राहू नयेत असे मानणारा हिंदू असू शकत नाही’ : मोहन भागवत

Spread the love

 

 

न्यूयॉर्क : ‘भारतात मुस्लिम राहू नयेत, असे कोणत्याही हिंदूला वाटत असेल, तर तो हिंदू असू शकत नाही. स्वतःला हिंदू म्हणवून घ्यायचे असेल, तर सर्व मार्ग एकाच ईश्वराकडे जातात, यावर विश्वास ठेवला पाहिजे,’ असे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी म्हटले.

न्यूयॉर्क येथे आयोजित ‘वन वर्ल्ड, वन ह्युमॅनिटी’ या कार्यक्रमाला संबोधित करताना भागवत यांनी भारतातील धार्मिक विविधता आणि मानवी एकतेवर भाष्य केले. भारतात विविध धर्म, श्रद्धा आणि जीवनपद्धतींचा आदर करण्याची परंपरा असून, हीच देशाची ताकद असल्याचे त्यांनी सांगितले.

‘हिंदू राष्ट्र’ या संकल्पनेचा अर्थ भारतातून मुस्लिमांना बाहेर काढणे असा अजिबात नाही, असे स्पष्ट करत भागवत म्हणाले की, विविधतेतही मानवी एकता जपणे ही भारताची पारंपरिक विचारधारा आहे.

२०१८ मध्ये काही मुस्लिम समाजातील व्यक्तींनी आपली भेट घेऊन ‘आरएसएसच्या हिंदू राष्ट्राच्या संकल्पनेतून मुस्लिमांना भारताबाहेर काढण्याचा विचार आहे का?’ असा प्रश्न विचारला होता. त्यावेळी आपण त्यांना ‘नाही, ते हिंदुत्व नाही. भारतात मुस्लिम राहू नयेत असे कोणत्याही हिंदूला वाटत असेल, तर तो हिंदू असू शकत नाही,’ असे सांगितल्याचे भागवत यांनी नमूद केले.

धर्म वेगवेगळे असले तरी मानवता एकच आहे. सत्य एकच असून त्यातूनच मानवतेची निर्मिती झाली आहे, अशी भारताची पारंपरिक धारणा असल्याचे त्यांनी सांगितले. धार्मिक विधी आणि आचार-विचारांना महत्त्व असले तरी धर्माचा अंतिम उद्देश सत्याचा शोध घेणे हा आहे, असेही भागवत यांनी स्पष्ट केले.

आपल्या विचाराचे उदाहरण देताना भागवत म्हणाले की, ‘मी प्रकाशाकडे बोट दाखवले, तर तुम्ही आधी माझे बोट पाहता आणि त्यानंतर प्रकाशाकडे पाहिले पाहिजे. मात्र बोटाकडेच पाहत राहिलात तर प्रकाश कधीच दिसणार नाही.’ त्याचप्रमाणे लोक वेगवेगळ्या धार्मिक मार्गांचा अवलंब करतात; मात्र अंतिमतः सर्व मार्ग एकाच दैवी सत्याकडे जातात, अशी भारताची भूमिका असल्याचे त्यांनी सांगितले.

भारताच्या इतिहासात विविध धर्मांच्या लोकांना आश्रय देण्याची परंपरा राहिली आहे. परकीय आक्रमणांमुळे देशाने अनेक गोष्टी गमावल्या, मात्र जगाला एक कुटुंब मानण्याची भारतीय परंपरा आजही कायम असल्याचे भागवत यांनी नमूद केले.

About Belgaum Varta

Check Also

अशोकधाम मंदिरात भीषण चेंगराचेंगरी; ६ भाविकांचा मृत्यू

Spread the love  लखीसराय : श्रावण महिन्यातील पवित्र सोमवारी बिहारच्या लखीसराय जिल्ह्यातील प्रसिद्ध अशोकधाम मंदिरात …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *