
बेळगाव, बळ्ळारी, हावेरी, बेंगळूर, म्हैसूर संघांची उपांत्य फेरीत
बेळगाव : अनगोळ येथील जनकल्याण ट्रस्ट संचलित संत मीरा इंग्रजी माध्यम शाळेच्या मैदानावर विद्याभारती कर्नाटक पुरस्कृत आणि विद्याभारती बेळगाव जिल्हा आयोजित राज्यस्तरीय मुला-मुलींच्या हँडबॉल स्पर्धेला उत्साहात प्रारंभ झाला. विविध गटांमध्ये झालेल्या सामन्यांत बेळगाव, हावेरी, बळ्ळारी, बेंगळूर आणि म्हैसूरच्या संघांनी प्रतिस्पर्ध्यांवर मात करीत उपांत्य फेरीत प्रवेश केला.
या राज्यस्तरीय स्पर्धेत कर्नाटकातील विविध जिल्ह्यांतील १४, १७ आणि १९ वर्षांखालील मुला-मुलींच्या संघांनी सहभाग घेतला आहे.
स्पर्धेच्या उद्घाटन समारंभास संत मीरा शाळेची माजी राष्ट्रीय खेळाडू स्नेहा कळ्ळी, आयुष बाचीकर, जनकल्याण ट्रस्टचे ट्रस्टी लक्ष्मण पवार, विद्याभारती जिल्हाध्यक्ष माधव पुणेकर, संत मीरा शाळेचे प्रशासक राघवेंद्र कुलकर्णी, मुख्याध्यापिका सुजाता दप्तरदार, उपमुख्याध्यापिका ऋतुजा जाधव तसेच विद्याभारतीचे शारीरिक प्रमुख चंद्रकांत पाटील उपस्थित होते.
प्रारंभी मान्यवरांच्या हस्ते ॐकार, सरस्वती आणि भारतमाता यांच्या प्रतिमांचे पूजन करून दीपप्रज्वलन करण्यात आले. त्यानंतर स्पर्धेचे अधिकृत उद्घाटन करण्यात आले. शाळेच्या वतीने माजी राष्ट्रीय खेळाडू स्नेहा कळ्ळी आणि आयुष बाचीकर यांचा विशेष सत्कार करण्यात आला.
यावेळी उपस्थित मान्यवरांनी विविध जिल्ह्यांतून आलेल्या खेळाडूंना मार्गदर्शन केले. खेळाडूंनी क्रीडाक्षेत्रात सातत्य, शिस्त, संघभावना आणि जिद्द ठेवून उत्कृष्ट कामगिरी करावी, असे आवाहन करण्यात आले. संत मीरा स्कूलची खेळाडू ईश्वरी कुलकर्णी हिने सहभागी खेळाडूंना क्रीडाशपथ दिली.
स्पर्धेच्या यशस्वी आयोजनासाठी पंच व अधिकाऱ्यांनी महत्त्वाची भूमिका बजावली. जयसिंग, धनाजी, प्रथमेश, उमेश मजुकर, बापू देसाई, प्रवीण पाटील, सोहेल बिजापुरे, श्रेयस खांडेकर, अनुराधा पुरी आणि शिवकुमार सुतार यांनी सामन्यांचे पंच म्हणून काम पाहिले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अमृता पेटकर यांनी केले, तर चंद्रकला यांनी आभार मानले.

Belgaum Varta Belgaum Varta