
बेळगाव : आबा हिंद स्पोर्ट्स क्लबच्या सहकार्याने मराठा युवक संघाच्या २१व्या भव्य आंतरशालेय आंतरराज्य जलतरण स्पर्धांना गोवावेस येथील महानगरपालिकेच्या जलतरण तलावात उत्साहात सुरुवात झाली.
स्पर्धेच्या उद्घाटनप्रसंगी उद्योजक महादेव चौगुले यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. त्यानंतर प्रमुख पाहुणे डॉ. रवी पाटील व अन्य मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन करण्यात आले. जलतरण तलावाचे पूजनही मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.
यावेळी डॉ. रवी पाटील यांनी उपस्थित जलतरणपटूंना शुभेच्छा देत जलतरण हा आरोग्यासाठी अत्यंत उपयुक्त खेळ असल्याचे सांगितले. उद्योजक महादेव चौगुले यांनी खेळाडूंनी राज्य, राष्ट्रीय तसेच आंतरराष्ट्रीय स्तरावर यश मिळविण्यासाठी कठोर परिश्रम करावेत, तसेच मोठे ध्येय निश्चित करून ते साध्य करण्यासाठी प्रामाणिक प्रयत्न करावेत, असे आवाहन केले.
हिंद स्पोर्ट्स क्लबच्या सेक्रेटरी सावित्री दोड्डणावर यांनी जलतरणपटू, पालक आणि प्रशिक्षकांच्या मेहनतीचे कौतुक केले. मराठा युवक संघाचे अध्यक्ष बाळासाहेब काकतकर यांनी संघाच्या कार्याचा आढावा घेताना सांगितले की, गेल्या ६० वर्षांपासून मराठा युवक संघ विविध क्रीडा प्रकारांना प्रोत्साहन देत आहे. बॉडीबिल्डिंग, वेटलिफ्टिंग, सायकलिंग, स्विमिंग आदी खेळांच्या माध्यमातून अनेक खेळाडू राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावर घडले आहेत. कै. एल. आर. पाटील यांच्या स्मरणार्थ या जलतरण स्पर्धांचे आयोजन दरवर्षी करण्यात येते, असेही त्यांनी सांगितले.
मराठा युवक संघाचे सेक्रेटरी चंद्रकांत गुंडकल यांनी सांगितले की, या आंतरशालेय आंतरराज्य स्पर्धेत बेळगावसह धारवाड, हुबळी, गोवा, बंगळूर, कोल्हापूर, इचलकरंजी आदी ठिकाणांहून ३०० हून अधिक जलतरणपटू सहभागी झाले आहेत.
यावेळी चार्टर्ड अकाउंटंट राजेंद्र मुंदडा, मराठा युवक संघाचे कार्याध्यक्ष रघुनाथ बांडगी, सुहास किल्लेकर, विकास कलघटगी, शेखर हंडे, जलतरण प्रशिक्षक विश्वास पवार, शुभांगी मंगळूरकर, अमित जाधव, संदीप मोहिते, ज्योती पवार आदी उपस्थित होते. मान्यवरांचे स्वागत नारायण किटवाडकर यांनी केले, तर उपस्थितांचे आभार त्यांनीच मानले.

Belgaum Varta Belgaum Varta