
विविध विषयांवर सकारात्मक चर्चा
बेळगाव : येत्या १४ सप्टेंबरपासून सुरू होणाऱ्या गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर आज, १ सप्टेंबर २०२६ रोजी ‘बेळगावचा राजा’ गणेश मंडळाच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांनी बेळगावचे पोलीस आयुक्त श्री. भूषण गुलाबराव बोरसे यांची पोलीस आयुक्तालयात जाऊन सदिच्छा भेट घेतली. या भेटीदरम्यान आगामी आगमन सोहळा, गणेश चतुर्थी आणि गणेश विसर्जन मिरवणुकीच्या नियोजनासंदर्भात पोलीस आयुक्तांसोबत सविस्तर व सकारात्मक चर्चा करण्यात आली.
सामाजिक प्रबोधनावर भर देण्याचे पोलीस आयुक्तांचे आवाहन
भेट घेतली असता पोलीस आयुक्त श्री बोरसे यांनी मंडळाच्या पदाधिकाऱ्यांना महत्त्वपूर्ण मार्गदर्शन केले. “गणेश उत्सव साजरा करत असताना सर्वच मंडळांनी सामाजिक जबाबदारीचे भान राखणे गरजेचे आहे. उत्सवाच्या काळात सामाजिक उपक्रम राबवून समाजाला दिशा देणारे प्रबोधनपर कार्य करावे,” असे आवाहन त्यांनी केले. मार्गदर्शन करतानाच त्यांनी बेळगावमधील विविध गणेश मंडळांच्या आजवरच्या शिस्तबद्ध आणि कौतुकास्पद कार्याचा गौरवही केला.
उद्या महत्त्वाची बैठक
उत्सवाचे नियोजन अधिक काटेकोर आणि शांततेत पार पाडण्यासाठी उद्या एक महत्त्वाची बैठक आयोजित करण्यात आली आहे. बेळगावचे डीसीपी (DCP) श्री. नारायण बरमनी, माजी आमदार अनिल बेनके आणि ‘बेळगावचा राजा’ गणेश मंडळाचे पदाधिकारी या बैठकीला उपस्थित राहणार असून, यामध्ये सुरक्षितता आणि आगामी नियोजनावर विस्तृत चर्चा केली जाईल.
बैठकीला उपस्थित पदाधिकारी
या सदिच्छा भेटीप्रसंगी ‘बेळगावचा राजा’ गणेश मंडळाचे अध्यक्ष श्री. श्रीनाथ पवार, सरचिटणीस प्राचार्य आनंद आपटेकर, उपाध्यक्ष उमेश मनसे, कार्यवाह निखिल पाटील, खजिनदार ऋषभ मोहिते, तसेच गणेश मोहिते, हरीश तहसीलदार आणि मंडळाचे इतर प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते.

Belgaum Varta Belgaum Varta