Sunday , September 20 2026
Breaking News

बनावट कागदपत्रांनी जमिनींचे हस्तांतरण; ‘एसआयटी’ चौकशीची मागणी

Spread the love

 

 

नानावाडीतील ७ एकर जमिनीच्या फेरफारावरून वकिल सचिन बिच्चू यांचे गंभीर आरोप; १९८४ च्या कथित मृत्युपत्राच्या नोंदीवरच प्रश्नचिन्ह

बेळगाव : बनावट कागदपत्रे, खोटे शासकीय शिक्के, बनावट सह्या आणि तोतयागिरीच्या माध्यमातून मिळकतींचे बेकायदेशीर हस्तांतरण करण्याचे प्रकार वाढत असून, अशा प्रकरणांची सखोल चौकशी करण्यासाठी विशेष तपास पथक (एसआयटी) स्थापन करावे, अशी मागणी वकील व सामाजिक कार्यकर्ते सचिन बिच्चू यांनी केली.

नानावाडी येथील कै. प्रभात दिनकर देसाई यांच्या सुमारे ७ एकर बिगरशेती जमिनीच्या कथित बेकायदेशीर हस्तांतरणाचा प्रकार पत्रकार परिषदेत मांडताना बिच्चू यांनी गंभीर आरोप केले. प्रभात देसाई यांचे नोव्हेंबर २०२५ मध्ये निधन झाले. त्यापूर्वी ७ मार्च २०२५ रोजी त्यांनी बेळगाव उपनिबंधक कार्यालयात अंतिम मृत्युपत्र नोंदणीकृत केले होते. या मृत्युपत्राद्वारे नानावाडी येथील ७ एकर जमीन त्यांची मुलगी अमांडा सोनी देसाई यांच्या नावे करण्यात आली होती, असा दावा बिच्चू यांनी केला.

मात्र, जमिनीच्या पुढील प्रक्रियेदरम्यान उतारा तपासला असता ७ जून २०२६ रोजी सुरेश श्रीपाद देशपांडे यांच्या नावाने फेरफार नोंद झाल्याचे निदर्शनास आले. या फेरफाराचा आधार तपासला असता, २४ नोव्हेंबर १९८४ रोजी प्रभात देसाई यांनी सुरेश देशपांडे यांच्या नावे कथित मृत्युपत्र केल्याची प्रमाणित प्रत महसूल अधिकाऱ्यांसमोर सादर करण्यात आल्याचे समोर आल्याचे बिच्चू यांनी सांगितले.

‘वारसांना नोटीसच नाही’

या फेरफार प्रक्रियेत प्रभात देसाई यांच्या कोणत्याही कायदेशीर वारसदाराला नोटीस देण्यात आली नाही. तसेच १९८४ मध्ये करण्यात आल्याचा दावा असलेल्या मृत्युपत्राबाबत आवश्यक न्यायालयीन प्रक्रिया अथवा कागदपत्रांची पुरेशी पडताळणी करण्यात आली नाही, असा आरोप बिच्चू यांनी केला.

उपनिबंधक कार्यालयात १९८४ च्या मृत्युपत्राची नोंदच नाही?

या प्रकरणी जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रार केल्यानंतर त्यांनी जिल्हा निबंधकांकडे चौकशीचे निर्देश दिल्याचे बिच्चू यांनी सांगितले. त्यानंतर जिल्हा निबंधक आणि संबंधित उपनिबंधक कार्यालयातील नोंदी व कागदपत्रांची पडताळणी करण्यात आली.

या पडताळणीत २४ नोव्हेंबर १९८४ रोजी प्रभात देसाई यांच्या नावाने असे कोणतेही मृत्युपत्र नोंदणीकृत झाल्याची नोंद उपलब्ध नसल्याचा दावा बिच्चू यांनी केला. महसूल अधिकाऱ्यांसमोर सादर करण्यात आलेली कथित प्रमाणित प्रतही बनावट असल्याचे निष्पन्न झाल्याचे त्यांनी सांगितले.

‘वयाच्या नोंदीतही धक्कादायक विसंगती’

कथित १९८४ च्या मृत्युपत्रातील माहितीमध्येही गंभीर विसंगती असल्याचे बिच्चू यांनी निदर्शनास आणून दिले. या दस्तऐवजात प्रभात देसाई यांचे १९८४ मध्ये वय ६८ वर्षे असल्याचे नमूद करण्यात आले आहे. हे वय बरोबर धरल्यास २०२५ मध्ये त्यांच्या निधनावेळी त्यांचे वय १०८ वर्षे झाले असते, अशी विसंगती त्यांनी मांडली.

‘जमीन बळकावण्याचा प्रयत्न’

“सरकारी अधिकाऱ्यांचे बनावट शिक्के, खोट्या सह्या आणि बनावट आधारकार्ड तयार करून मिळकतींचे हस्तांतरण करण्याचे प्रकार अत्यंत गंभीर आहेत. या प्रकरणामागे कोण आहेत आणि या संपूर्ण प्रकाराचे सूत्रधार कोण आहेत, याचा पोलिसांनी शोध घेणे आवश्यक आहे,” असे बिच्चू यांनी सांगितले.

बनावट कागदपत्रांच्या आधारे प्रथम एखादी मिळकत दुसऱ्याच्या नावावर हस्तांतरित केली जाते. त्यानंतर तीच मिळकत तिसऱ्या व्यक्तीला विक्री करून वाद निर्माण केला जातो. पुढे मूळ मालकाशी तडजोड करण्याच्या नावाखाली पैसे उकळण्याचा प्रयत्न केला जात असल्याचा आरोपही त्यांनी केला.

हा प्रकार ब्लॅकमेलिंगचा एक प्रकार असून, अशा गैरप्रकारांना आळा घालण्यासाठी पोलिसांनी कठोर कारवाई करावी, अशी मागणी त्यांनी केली.

बेळगावमध्ये गेल्या काही महिन्यांत अशा स्वरूपाची अनेक प्रकरणे समोर आल्याचा दावा करत, जिल्हाधिकारी आणि पोलीस आयुक्तांनी एसआयटी स्थापन करून बनावट कागदपत्रांच्या आधारे होणाऱ्या मिळकत हस्तांतरणाची सखोल चौकशी करावी, अशी मागणी बिच्चू यांनी केली.

तसेच सुरेश श्रीपाद देशपांडे यांच्यासह बनावट कागदपत्रांची निर्मिती, सादरीकरण अथवा वापर करण्यात सहभागी असलेल्या सर्व व्यक्तींची चौकशी करावी आणि दोषी आढळणाऱ्यांविरुद्ध कठोर कायदेशीर कारवाई करावी, अशी मागणीही त्यांनी केली.

About Belgaum Varta

Check Also

‘बेळगांवचा कैवारी’चा अभिनव उपक्रम; गणेशोत्सवात ‘ज्ञान दान’

Spread the love  बेळगाव : गणेशोत्सव हा भक्ती, श्रद्धा आणि उत्साहाचा सण असला तरी सामाजिक …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *