Sunday , September 20 2026
Breaking News

महागाईच्या भडक्यात जनता होरपळली; बेरोजगारीने तरुण हैराण!

Spread the love

 

सीपीआयचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर जोरदार निदर्शने; बॅलेट पेपरवर निवडणुकांची मागणी

बेळगाव : वाढती महागाई, बेरोजगारी, शिक्षणाचे खासगीकरण, कामगारांच्या हक्कांवरील गदा आणि सामाजिक भेदभावाच्या प्रश्नांवरून कम्युनिस्ट पार्टी ऑफ इंडिया (सीपीआय)च्या बेळगाव शाखेने मंगळवारी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर जोरदार निदर्शने केली. केंद्र सरकारच्या धोरणांविरोधात घोषणाबाजी करत आंदोलकांनी सरकारचे लक्ष जनतेच्या ज्वलंत प्रश्नांकडे वेधले.

दिल्लीतील रामलीला मैदानावर आयोजित करण्यात आलेल्या ‘चेंज इज नॅसेसरी रॅली’ला पाठिंबा देण्यासाठी हे आंदोलन करण्यात आले. महागाई कमी करा, युवकांना रोजगार द्या, शिक्षणाचे खासगीकरण थांबवा, कामगारांचे हक्क अबाधित ठेवा आणि सामाजिक अन्यायाला आळा घाला, अशा मागण्या यावेळी करण्यात आल्या.

सीपीआयचे जिल्हा सचिव अनिल आजगावकर यांनी केंद्र सरकारच्या कारभारावर तीव्र शब्दांत टीका केली. २०१४ पासून सत्तेत असलेल्या सरकारने जनतेला दिलेली अनेक आश्वासने प्रत्यक्षात उतरविण्यात अपयश आले आहे, असा आरोप त्यांनी केला. रोजगाराच्या प्रतीक्षेत असलेला तरुण, वाढत्या महागाईने त्रस्त असलेले कुटुंब, महागड्या शिक्षणामुळे अडचणीत आलेले विद्यार्थी आणि हक्कांसाठी संघर्ष करणारा कामगार यांच्याकडे सरकारने गांभीर्याने पाहण्याची गरज असल्याचे त्यांनी सांगितले.

दलितांवरील अत्याचार, सामाजिक भेदभाव आणि कामगारांच्या हक्कांवरील वाढते आक्रमण याविरोधात सरकारने ठोस भूमिका घ्यावी, अशी मागणीही त्यांनी केली. शिक्षण हे सर्वसामान्यांच्या आवाक्यात राहावे, त्याचे व्यापारीकरण थांबवावे, अशी मागणी आंदोलकांनी केली.

दरम्यान, निवडणुकांमध्ये पुन्हा बॅलेट पेपरचा वापर करावा, लोकशाही संस्थांचे संरक्षण करावे आणि निवडणूक प्रक्रियेबाबत जनतेचा विश्वास अधिक बळकट करण्यासाठी आवश्यक पावले उचलावीत, अशी मागणी आंदोलनकर्त्यांनी केली.

यावेळी अनिल आजगावकर, नागेश सतेरी, कृष्णा शाहापूरकर, आनंद मेणसे यांच्यासह सीपीआयचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. विविध पुरोगामी संघटनांच्या प्रतिनिधींनीही आंदोलनाला पाठिंबा देत केंद्र सरकारच्या धोरणांवर नाराजी व्यक्त केली.

About Belgaum Varta

Check Also

‘बेळगांवचा कैवारी’चा अभिनव उपक्रम; गणेशोत्सवात ‘ज्ञान दान’

Spread the love  बेळगाव : गणेशोत्सव हा भक्ती, श्रद्धा आणि उत्साहाचा सण असला तरी सामाजिक …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *