Sunday , September 20 2026
Breaking News

दुसऱ्याच्या भूखंडाची परस्पर विक्री; ८० वर्षीय वृद्धेला अटक

Spread the love

 

मालक असल्याचे भासवून उपनिबंधक कार्यालयात अंगठा ठसा अन् फोटो; साथीदार संशयित फरारी

बेळगाव : दुसऱ्याच्या मालकीचा भूखंड आपलाच असल्याचे भासवून त्याची परस्पर विक्री केल्याच्या आरोपावरून मार्केट पोलिसांनी ८० वर्षीय वृद्धेला अटक केली आहे. या फसवणूक प्रकरणात तिला मदत करणारा राहुल अनिल मगदूम (रा. काकती) हा संशयित फरारी असून, पोलिसांकडून त्याचा शोध सुरू आहे.

मंदाकिनी सदाशिव पारिशवाडकर (वय ८०, रा. शिवाजी रोड, मुजावर गल्ली, सध्या रा. गणेश कॉलनी, वडगाव) असे अटक केलेल्या संशयित महिलेचे नाव आहे.

याप्रकरणी रत्ना यशवंत मब्रुकर (वय ६८) यांनी ४ फेब्रुवारी २०२५ रोजी मार्केट पोलिस ठाण्यात फिर्याद दाखल केली होती. फिर्यादीनंतर पोलिसांनी तपासाची चक्रे फिरवत मंदाकिनी पारिशवाडकर हिला ताब्यात घेत चौकशी केली.

चौकशीत धक्कादायक माहिती समोर आली. कणबर्गी रोडवरील ४० बाय ५० आकाराच्या भूखंडाची आपणच मालक असल्याचे भासवून तो भूखंड विकल्याची कबुली मंदाकिनी हिने दिल्याचे पोलिसांनी सांगितले. विशेष म्हणजे, १६ सप्टेंबर २०२३ रोजी उत्तर विभाग उपनिबंधक कार्यालयात वेबकॅमेरासमोर छायाचित्र काढून तसेच अंगठ्याचा ठसा देत विक्री व्यवहाराची प्रक्रिया पूर्ण करण्यात आली होती.

मालकी नसतानाही दुसऱ्याच्या भूखंडाची विक्री करण्यामागे राहुल मगदूम याचा सहभाग असल्याचा पोलिसांना संशय आहे. त्यानेच मंदाकिनी हिला या व्यवहारासाठी प्रवृत्त केल्याचे तपासात निष्पन्न झाल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले. मात्र, प्रकरण उघडकीस आल्यानंतर राहुल मगदूम फरारी झाला असून, त्याचा शोध घेण्यासाठी पोलिसांची पथके कार्यरत आहेत.

दरम्यान, या प्रकरणातील आर्थिक व्यवहार, बनावट कागदपत्रे तसेच भूखंड विक्रीच्या संपूर्ण प्रक्रियेत आणखी कोणाचा सहभाग आहे का, याचा तपास मार्केट पोलिसांकडून सुरू आहे.

About Belgaum Varta

Check Also

‘बेळगांवचा कैवारी’चा अभिनव उपक्रम; गणेशोत्सवात ‘ज्ञान दान’

Spread the love  बेळगाव : गणेशोत्सव हा भक्ती, श्रद्धा आणि उत्साहाचा सण असला तरी सामाजिक …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *