
बेळगाव : देशाच्या सीमेवर ऊन, वारा, पाऊस आणि प्रतिकूल परिस्थितीची पर्वा न करता मातृभूमीच्या रक्षणासाठी अहोरात्र कर्तव्य बजावणाऱ्या सैनिक बांधवांप्रति कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी मराठी विद्यानिकेतन बेळगाव येथे ‘पहिली राखी सैनिकांसाठी’ हा उपक्रम राबविण्यात आला. शाळेतील बालवाडीपासून दहावीच्या विद्यार्थ्यांनी स्वतःच्या हाताने सुंदर राख्या तयार केल्या. या राख्यांवर सैनिक बांधवांना समर्पित विविध भावनिक संदेश लिहून विद्यार्थ्यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या. आपल्या हाताने तयार केलेली राखी देशरक्षणासाठी सीमेवर उभ्या असलेल्या सैनिकांच्या मनगटावर बांधली जाणार, या भावनेने विद्यार्थ्यांमध्ये विशेष उत्साह पाहायला मिळाला. राखीच्या धाग्यातून सैनिकांप्रति असलेला आदर, प्रेम आणि कृतज्ञता व्यक्त करण्याचा हा प्रयत्न विद्यार्थ्यांच्या मनावर देशप्रेमाचे संस्कार रुजविणारा ठरत आहे. ‘आम्ही तुमच्या पाठीशी आहोत…
तुम्ही देशाचे रक्षण करता, म्हणून आम्ही निर्धास्त आहोत!’ हा भाव या चिमुकल्यांच्या प्रत्येक राखीतून व्यक्त झाला. सैनिकांच्या मनगटावर बांधली जाणारी ही राखी केवळ धागा नसून, देशाच्या रक्षणासाठी झटणाऱ्या प्रत्येक वीर जवानासाठी एका चिमुकल्या मनाने पाठवलेली प्रेमाची, कृतज्ञतेची आणि सुरक्षिततेची हाक आहे. या उपक्रमातून विद्यार्थ्यांना रक्षाबंधनाचा खरा अर्थ समजला असून, सैनिकांप्रती आदर आणि देशप्रेमाची भावना त्यांच्या मनात रुजते. ‘आधार सोशल ट्रस्ट पुणे’तर्फे घेण्यात आलेला हा उपक्रम आहे. या राख्या राजस्थानमधील बिकानेर येथील जवानांना पाठवल्या गेल्या.
प्राथमिक विभागाचे मुख्याध्यापक बी. जी. पाटील, माध्यमिक मुख्याध्यापक नारायण उडकेकर, संयोजिका नीला आपटे, शिक्षक समन्वयक सविता पवार, शैक्षणिक समुपदेशक गौरी चौगुले, शिक्षक, विद्यार्थी, स्नेहल पोटे, मुक्ता आलगोंडी यांनी विशेष परिश्रम घेतले.

Belgaum Varta Belgaum Varta