Sunday , September 20 2026
Breaking News

सलामवाडीत श्री हनुमान मंदिराचा वास्तुशांती, मूर्ती प्रतिष्ठापना व कळसारोहण सोहळा ४ सप्टेंबरला

Spread the love

 

दड्डी : सलामवाडी, ता. हुक्केरी येथे ग्रामस्थ, दानशूर व्यक्ती व भक्तांच्या सहकार्याने नव्याने उभारण्यात आलेल्या श्री हनुमान मंदिराचा वास्तुशांती, मूर्ती प्रतिष्ठापना व कळसारोहण सोहळा शुक्रवार, दि. ४ सप्टेंबर २०२६ रोजी विविध धार्मिक कार्यक्रमांनी मोठ्या उत्साहात आयोजित करण्यात आला आहे.

माजी खासदार मा. श्री. अण्णासाहेब जोल्ले यांच्या निधीतून, तसेच बेळगाव जिल्ह्याचे पालकमंत्री व सार्वजनिक बांधकाम मंत्री मा. श्री. सतीशअण्णा जारकीहोळी यांनी सभामंडपासाठी केलेल्या मदतीने, गावातील दानशूर व्यक्ती व ग्रामस्थांच्या लोकवर्गणीतून श्री हनुमान मंदिराची उभारणी करण्यात आली आहे. मंदिराच्या या धार्मिक सोहळ्यामुळे सलामवाडी व पंचक्रोशी परिसरात भक्तिमय वातावरण निर्माण झाले आहे.

या सोहळ्यास परमपूज्य श्री. म. नि. प्र. गुरुसिद्धेश्वर महास्वामीजी, श्री सिद्धेश्वर सुक्षेत्र मठ, हत्तरगी यांची दिव्य सान्निध्य लाभणार आहे. तसेच माजी खासदार अण्णासाहेब जोल्ले आणि पालकमंत्री सतीशअण्णा जारकीहोळी यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे.

धार्मिक कार्यक्रमांची रूपरेषा

शुक्रवार, दि. ४ सप्टेंबर रोजी सकाळी ८ ते ११ वाजेपर्यंत मुहूर्तमेढ रोवणे, गणेशपूजा, पुण्याहवाचन, नवग्रह पूजा, सूत घालणे व होम-हवन आदी धार्मिक विधी होणार आहेत.

त्यानंतर सकाळी ११ वाजता मूर्तीला अभिषेक करण्यात येणार आहे. दुपारी १२.१५ वाजता कळसारोहण व प्रवचन आयोजित करण्यात आले असून, परमपूज्य गुरुसिद्धेश्वर महास्वामीजी यांच्या दिव्य सान्निध्यात हा सोहळा पार पडणार आहे. दुपारी २ वाजता महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे.

रात्री श्री भावेश्वरी भजनी मंडळ, सलामवाडी यांच्या वतीने भजनाचा कार्यक्रम होणार आहे.

या मंगल धार्मिक सोहळ्यास सलामवाडी तसेच पंचक्रोशीतील सर्व ग्रामस्थ, भक्तगण, दानशूर व्यक्ती, महिला व बालगोपालांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून श्री हनुमानाचा आशीर्वाद घ्यावा, असे आवाहन जय हनुमान सेवा मंडळ, सलामवाडी ग्रामस्थ व मुंबई यांच्या वतीने करण्यात आले आहे.

या सोहळ्याच्या निमित्ताने मंदिर परिसरात भक्तांची मोठी गर्दी होण्याची अपेक्षा असून, संपूर्ण सलामवाडी गाव धार्मिक उत्साहाने सज्ज झाले आहे.

About Belgaum Varta

Check Also

गणेशोत्सवासाठी यमकनमर्डी पोलिसांकडून गणेश मंडळाना मार्गदर्शक सूचना : पीएसआय आर. बी. पाटील

Spread the love  मंडप, मिरवणूक व विसर्जनावेळी नियमांचे पालन करण्याचे आवाहन दड्डी वार्ताहर.. आगामी गणेशोत्सवाच्या …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *