Sunday , September 20 2026
Breaking News

गोकुळाष्टमी, वैभव लक्ष्मीच्या खरेदीने बाजारपेठ फुलली

Spread the love

 

गणेशोत्सवाच्या साहित्याचीही लगबग; गणपत गल्लीसह प्रमुख बाजारपेठांमध्ये वाहतूक कोंडी

बेळगाव : श्रावण महिन्याचा शेवटचा शुक्रवार, वैभव लक्ष्मी व्रताची सांगता आणि गोकुळाष्टमीच्या पार्श्वभूमीवर शहरातील बाजारपेठेत गुरुवारपासूनच खरेदीची मोठी लगबग सुरू झाली. सकाळपासूनच महिला आणि नागरिकांची गर्दी वाढल्याने गणपत गल्ली, पांगुळ गल्ली, मारुती गल्ली, खडेबाजार यासह प्रमुख बाजारपेठांना उत्सवी स्वरूप प्राप्त झाले होते.

वैभव लक्ष्मी व्रताच्या सांगतेसाठी तसेच गोकुळाष्टमीच्या पूजेसाठी आवश्यक साहित्य खरेदी करण्यासाठी महिलांची मोठी गर्दी झाली होती. बाजारपेठेतील विविध ठिकाणी फळांचे संच, पाने-फुले, केळीच्या फांद्या, गजरे, हार, देवीचे मुखवटे तसेच महिलांच्या ओटी भरण्यासाठी देण्यात येणाऱ्या साहित्यांची दुकाने थाटण्यात आली होती. त्यामुळे पूजासाहित्याने बाजारपेठ अक्षरशः सजली होती.

दरम्यान, गणेशोत्सव अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपल्याने गणेशमूर्ती सजावटीसाठी लागणारे साहित्य, आकर्षक सजावटीच्या वस्तू, पूजेचे साहित्य आणि इतर आवश्यक वस्तूंच्या खरेदीलाही सुरुवात झाली आहे. गोकुळाष्टमी आणि गणेशोत्सवाच्या खरेदीमुळे बाजारपेठेत सर्वत्र उत्साहाचे वातावरण निर्माण झाले असून, नागरिकांची लगबग वाढल्याचे चित्र दिसून आले.

गर्दीने रस्ते फुलले; वाहतुकीचा बोजवारा

सणासुदीच्या खरेदीसाठी शुक्रवारी सकाळपासूनच नागरिकांची गर्दी वाढल्याने शहरातील प्रमुख रस्त्यांवर वाहतुकीचा बोजवारा उडाला. दुचाकी आणि चारचाकी वाहनांची संख्या वाढल्याने अनेक ठिकाणी वाहतूक कोंडी निर्माण झाली.

गणपत गल्लीमध्ये रस्त्याच्या दुतर्फा उभे असलेले फेरीवाले आणि खरेदीसाठी आलेल्या नागरिकांची गर्दी यामुळे वाहतूक ठप्प होण्याची परिस्थिती निर्माण झाली होती. पांगुळ गल्लीमध्येही गणेशोत्सवाच्या साहित्याच्या खरेदीसाठी आलेल्या नागरिकांना वाहतूक कोंडीचा सामना करावा लागला.

खडेबाजार, किर्लोस्कर रोड, मारुती गल्ली, रामदेव गल्ली, रविवार पेठ आणि संयुक्त महाराष्ट्र चौक या प्रमुख खरेदीच्या ठिकाणी दिवसभर वाहनांची वर्दळ आणि नागरिकांची गर्दी कायम होती. अनेक वाहनधारकांकडून वाहतुकीच्या नियमांकडे दुर्लक्ष होत असल्याने कोंडीत आणखी भर पडत होती. सणासुदीच्या काळात वाढणारी गर्दी लक्षात घेता वाहतूक पोलिसांनी नियोजनबद्ध उपाययोजना करून वाहतुकीला शिस्त लावण्याची गरज व्यक्त होत आहे.

About Belgaum Varta

Check Also

‘बेळगांवचा कैवारी’चा अभिनव उपक्रम; गणेशोत्सवात ‘ज्ञान दान’

Spread the love  बेळगाव : गणेशोत्सव हा भक्ती, श्रद्धा आणि उत्साहाचा सण असला तरी सामाजिक …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *