
बेळगाव : मुतगा येथील रहिवासी महावीर बाबू गुडाज (५०) यांचा शुक्रवारी पहाटे मॉर्निंग वॉकसाठी जात असताना झालेल्या भीषण अपघातात जागीच मृत्यू झाला. सांबरा रोडच्या दिशेने जात असताना एका भरधाव अनोळखी दुचाकीने त्यांना जोरदार धडक दिल्याची प्राथमिक माहिती आहे.
धडकेनंतर महावीर गुडाज यांना सुमारे १०० फूट अंतरापर्यंत फरफटत नेण्यात आल्याचा आरोप आहे. या भीषण अपघातात त्यांचा जागीच मृत्यू झाला. अपघातानंतर दुचाकीस्वार पसार झाल्याचे सांगण्यात येत आहे.
महावीर गुडाज हे भाजपच्या बेळगाव ग्रामीण अल्पसंख्याक युवा मोर्चाचे उपाध्यक्ष होते. त्यांच्या पश्चात पत्नी, एक मुलगा व एक मुलगी असा परिवार आहे.
या दुर्घटनेमुळे मुतगा गावात हळहळ व्यक्त होत असून, अपघातास कारणीभूत दुचाकीस्वाराचा तातडीने शोध घेऊन त्याच्यावर कठोर कारवाई करण्याची मागणी होत आहे. संबंधित पोलीस या घटनेचा अधिक तपास करीत आहेत.

Belgaum Varta Belgaum Varta