Sunday , September 20 2026
Breaking News

‘बेळगावच्या राजा’चे शहरात दिमाखात आगमन; ढोल-ताशांच्या गजरात भव्य मिरवणूक

Spread the love

 

बेळगाव : संस्कृती आणि परंपरेचा समृद्ध वारसा लाभलेल्या बेळगाव शहरात गणेशोत्सवाचे भक्तिमय वातावरण निर्माण झाले असून, सर्वांचे लक्ष लागून राहिलेल्या ‘बेळगावचा राजा’ म्हणून प्रसिद्ध असलेल्या चव्हाट गल्लीतील श्री गणेशमूर्तीचे शनिवारी शहरात दिमाखात आगमन झाले. पारंपरिक वाद्ये आणि ढोल-ताशांच्या गजरात काढण्यात आलेल्या भव्य मिरवणुकीने शहरातील वातावरण भक्तिमय झाले होते.

धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज चौकात माजी आमदार अनिल बेनके, डीसीपी नारायण बरमनी, विजय जाधव, एसीपी संतोष सत्यानायक, खडेबाजार विभागाचे एसीपी, पोलीस निरीक्षक जे. एम. कालीमिर्ची, विकास कलघटगी, मुरुगेंद्रगौडा पाटील, सुनील जाधव आणि श्रीनाथ पवार यांच्यासह अन्य मान्यवरांच्या हस्ते श्री गणेशमूर्तीची विधिवत पूजा करण्यात आली.

पिरणवाडी येथील प्रसिद्ध मूर्तिकार रवी लोहार यांनी साकारलेली सुमारे २० फूट उंच चतुर्भुज श्री गणेशमूर्ती यावर्षी विशेष आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरली आहे. आकर्षक आणि भव्य स्वरूपातील या मूर्तीचे दर्शन घेण्यासाठी भाविकांनी मोठी गर्दी केली होती.

पूजेनंतर पारंपरिक वाद्ये, ढोल-ताशे आणि जयघोषाच्या गजरात मिरवणुकीला प्रारंभ झाला. धर्मवीर संभाजी महाराज चौकातून निघालेली ही मिरवणूक राणी चन्नम्मा चौक, कोर्ट रोड मार्गे चव्हाट गल्लीत पोहोचली. मार्गावर रस्त्याच्या दुतर्फा उभ्या असलेल्या हजारो भाविकांनी ‘बेळगावच्या राजा’चे दर्शन घेत उत्साहाने स्वागत केले.

मिरवणुकीदरम्यान कोणताही अनुचित प्रकार घडू नये तसेच वाहतूक आणि कायदा-सुव्यवस्था सुरळीत राहावी यासाठी पोलीस प्रशासनाने चोख बंदोबस्त ठेवला होता.

‘बेळगावच्या राजा’च्या भव्य आगमनाने शहरातील गणेशोत्सवाच्या उत्साहाला खऱ्या अर्थाने सुरुवात झाली असून, पुढील काही दिवस बेळगाव शहर गणरायाच्या भक्तीत आणि उत्सवाच्या जल्लोषात रंगून जाणार आहे.

About Belgaum Varta

Check Also

‘बेळगांवचा कैवारी’चा अभिनव उपक्रम; गणेशोत्सवात ‘ज्ञान दान’

Spread the love  बेळगाव : गणेशोत्सव हा भक्ती, श्रद्धा आणि उत्साहाचा सण असला तरी सामाजिक …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *