
बेळगाव : गोकुळाष्टमीचा उत्सव सर्वत्र भक्तिभावाने साजरा होत असताना, बेळगाव येथील मराठा लाईट इन्फंट्री रेजिमेंटल सेंटरमध्ये (मराठा एलआयआरसी) भगवान श्रीकृष्ण जन्माष्टमी उत्साह, श्रद्धा आणि लष्करी परंपरेच्या दिमाखात साजरी करण्यात आली. ४ सप्टेंबर रोजी मिलिटरी महादेव मंदिरात विशेष पूजा, प्रार्थना आणि धार्मिक विधी पार पडले.
या कार्यक्रमाला मराठा एलआयआरसीचे कमांडंट ब्रिगेडियर गिरीश उपाध्याय, SM, VSM तसेच फॅमिली वेल्फेअर ऑर्गनायझेशनच्या अध्यक्षा श्रीमती वेदा उपाध्याय यांच्यासह अधिकारी, जेसीओ, जवान आणि त्यांचे कुटुंबीय मोठ्या संख्येने उपस्थित होते.
जन्माष्टमीनिमित्त भगवान श्रीकृष्णाच्या जन्माचे औचित्य साधून मंदिरात विशेष पूजा व प्रार्थना करण्यात आली. धार्मिक वातावरणात पार पडलेल्या या कार्यक्रमात जवानांसह त्यांच्या कुटुंबीयांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदविला.
दरम्यान, ५ सप्टेंबर रोजी सकाळी आंतर-बटालियन दहीहंडी स्पर्धेचे आयोजन करण्यात आले. विविध बटालियनच्या संघांनी स्पर्धेत उत्साहाने सहभाग घेतला. दहीहंडी फोडण्यासाठी जवानांनी दाखविलेली जिद्द, सांघिक भावना, शिस्त आणि स्पर्धात्मक वृत्ती यामुळे संपूर्ण परिसरात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले.
या जन्माष्टमी उत्सवातून श्रद्धा, भारतीय संस्कृती, परंपरा आणि लष्करी रेजिमेंटल भावना यांचा अनोखा संगम अनुभवायला मिळाला. धार्मिक उत्सवाच्या निमित्ताने जवान आणि त्यांच्या कुटुंबीयांमधील स्नेहबंध अधिक दृढ झाले, तसेच भारतीय संस्कृती व परंपरेप्रती असलेला अभिमानही अधोरेखित झाला.

Belgaum Varta Belgaum Varta