Sunday , September 20 2026
Breaking News

संजीवनी काळजी केंद्रात जन्माष्टमीचा भक्तिमय जल्लोष

Spread the love

 

 

जन्माष्टमीदिनी जन्मलेल्या गोपाळकृष्ण शानभाग यांचा शताब्दी वाढदिवस उत्साहात

बेळगाव : संजीवनी फाउंडेशनच्या काळजी केंद्रात श्रीकृष्ण जन्माष्टमीचा उत्सव भक्तिमय आणि आनंददायी वातावरणात उत्साहात साजरा करण्यात आला. केंद्रातील ज्येष्ठ नागरिक व रहिवाशांना विविध पारंपरिक वेशभूषेत सजविण्यात आले होते. राधा-कृष्णाची जोडी, बालकृष्ण तसेच अन्य आकर्षक वेशभूषांनी कार्यक्रमाची रंगत वाढविली.

या सोहळ्याचे खास आकर्षण ठरले ते जन्माष्टमीच्या दिवशीच १९२६ मध्ये जन्मलेल्या गोपाळकृष्ण शानभाग यांच्या शंभराव्या वाढदिवसाचे. गेल्या अनेक वर्षांपासून संजीवनी काळजी केंद्रात वास्तव्यास असलेल्या शानभाग यांचे केंद्रातील रहिवासी आणि कर्मचाऱ्यांशी जिव्हाळ्याचे नाते निर्माण झाले आहे.

यावेळी शानभाग यांचे औक्षण करून आरती करण्यात आली. उपस्थितांनी त्यांना शतायुष्यासाठी शुभेच्छा दिल्या. त्यानंतर केक कापून त्यांचा शंभरावा वाढदिवस आनंदात साजरा करण्यात आला. या अनोख्या योगामुळे केंद्रातील रहिवासी व कर्मचाऱ्यांमध्ये विशेष उत्साहाचे वातावरण निर्माण झाले.

कार्यक्रमाच्या प्रारंभी भगवान श्रीकृष्णाच्या प्रतिमेचे पूजन व दीपप्रज्वलन करण्यात आले. भजन, नामस्मरण आणि आरतीमुळे संपूर्ण परिसर भक्तिरसात न्हाऊन निघाला. विविध वेशभूषेतील ज्येष्ठ नागरिक व कर्मचाऱ्यांनी उपस्थितांचे लक्ष वेधून घेतले.

सायंकाळी दहीहंडी फोडण्याचा कार्यक्रमही उत्साहात पार पडला. दहीहंडी फोडताना उपस्थितांनी उत्स्फूर्त सहभाग घेतला. टाळ्यांचा कडकडाट आणि ‘श्रीकृष्णाचा जयजयकार’ यामुळे संपूर्ण परिसर दुमदुमून गेला.

एचआर कावेरी लमानी यांच्या नेतृत्वाखाली कार्यक्रमाचे नियोजन करण्यात आले. समुपदेशक सावित्री माळी, पुष्पा बेंडवाड, अर्चना शिरहट्टी, अक्षता अक्कोळे, अंकिता राजोरे आणि अंकिता सूर्यवंशी यांनी कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी विशेष परिश्रम घेतले.

श्रीकृष्ण जन्माष्टमीचा भक्तिमय उत्साह, शतायुषी गोपाळकृष्ण शानभाग यांचा शंभरावा वाढदिवस आणि दहीहंडीचा जल्लोष, या तिहेरी आनंदाने संजीवनी काळजी केंद्रातील हा दिवस सर्वांसाठी अविस्मरणीय ठरला.

About Belgaum Varta

Check Also

‘बेळगांवचा कैवारी’चा अभिनव उपक्रम; गणेशोत्सवात ‘ज्ञान दान’

Spread the love  बेळगाव : गणेशोत्सव हा भक्ती, श्रद्धा आणि उत्साहाचा सण असला तरी सामाजिक …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *