Sunday , September 20 2026
Breaking News

वडगावातील खड्डे जैसे थे; ‘डेव्हलपमेंट किंग’च्या दक्षिण मतदारसंघात रस्त्यांची दुरवस्था!

Spread the love

 

 

गणेशोत्सव तोंडावर तरी प्रशासनाला जाग नाही; स्मार्ट सिटीच्या घोषणा कागदावरच, स्थानिक लोकप्रतिनिधींचे अक्षम्य दुर्लक्ष

बेळगाव : गणेशोत्सव अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपला असतानाही वडगाव परिसरातील रस्त्यांवरील जीवघेणे खड्डे अद्याप बुजविण्यात आलेले नाहीत. त्यामुळे नागरिकांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत असून, ‘स्मार्ट सिटीच्या घोषणा आणि विकासाच्या गप्पा नेमक्या कुठे गेल्या?’ असा सवाल उपस्थित केला जात आहे. दक्षिण मतदारसंघातील विकासकामांचा गवगवा केला जात असताना प्रत्यक्षात वडगाव परिसरातील रस्त्यांची झालेली दुरवस्था विकासाच्या दाव्यांची पोलखोल करणारी ठरत आहे.

दक्षिण भागातील लोकप्रतिनिधींकडून स्वतःला ‘डेव्हलपमेंट किंग’ म्हणून पुढे केले जात असले, तरी त्यांच्या मतदारसंघातील प्रमुख रस्त्यांची अवस्था पाहता विकासाची ही बिरुदावली केवळ प्रसिद्धीपुरतीच मर्यादित राहिली आहे का, असा संतप्त सवाल नागरिकांतून केला जात आहे. स्मार्ट सिटीच्या नावाखाली कोट्यवधी रुपयांच्या विकासाच्या घोषणा करण्यात आल्या; मात्र वडगावातील रस्त्यांवरील खड्डे पाहता स्मार्ट सिटीची स्वप्ने कागदावरच आणि प्रत्यक्ष रस्त्यावर मात्र खड्ड्यांचे साम्राज्य, अशी परिस्थिती निर्माण झाली आहे.

वडगाव बाजारपेठ, मुख्य रस्ते तसेच अंतर्गत मार्गांवर ठिकठिकाणी मोठमोठे खड्डे पडले आहेत. पावसामुळे या खड्ड्यांमध्ये पाणी साचत असल्याने वाहनचालकांना त्यांचा अंदाज येत नाही. विशेषतः दुचाकीस्वारांना जीव मुठीत धरून वाहन चालवावे लागत आहे. खड्ड्यांमध्ये पाणी आणि चिखल साचल्याने रस्त्यांची अवस्था अधिकच बिकट झाली असून, नागरिकांना मोठ्या गैरसोयीला सामोरे जावे लागत आहे.

विशेष म्हणजे, नुकत्याच झालेल्या ग्रामदेवता मंगाई देवी यात्रा उत्सवाच्या पार्श्वभूमीवर महापौर, उपमहापौर, महानगरपालिका आयुक्त आणि शहर अभियंता यांनी वडगाव परिसरातील रस्त्यांची पाहणी केली होती. यावेळी खड्डे बुजवून रस्त्यांची दुरुस्ती करण्याच्या सूचनाही देण्यात आल्या होत्या. मात्र पाहणी, सूचना आणि आश्वासनांनंतरही रस्त्यांची परिस्थिती जैसे थेच असल्याने लोकप्रतिनिधी आणि प्रशासनाच्या कार्यक्षमतेवरच प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

गणेशोत्सवाच्या काळात वडगाव परिसरात मोठ्या प्रमाणात नागरिकांची वर्दळ असते. सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांच्या मिरवणुका, गणेशमूर्तींची ने-आण तसेच भाविकांची मोठ्या प्रमाणात होणारी ये-जा लक्षात घेता रस्त्यांवरील खड्डे तातडीने बुजविणे अत्यावश्यक आहे. मात्र उत्सव तोंडावर आला तरी रस्ते दुरुस्तीबाबत ठोस कार्यवाही होत नसल्याने एखादी दुर्घटना घडल्यानंतरच प्रशासनाला जाग येणार का? असा संतप्त सवाल नागरिक विचारत आहेत.

खड्ड्यांमुळे वाहतुकीचा वेग मंदावत असून अनेक ठिकाणी वाहतूक कोंडीची समस्या निर्माण होत आहे. उत्सवाच्या काळात ही समस्या आणखी गंभीर होण्याची शक्यता आहे. त्यामुळे प्रशासनाने केवळ खड्ड्यांमध्ये माती-मुरूम टाकून तात्पुरती मलमपट्टी करण्याऐवजी त्यांचे कायमस्वरूपी डांबरीकरण करावे, अशी मागणी होत आहे.

एका बाजूला स्मार्ट सिटी, विकासकामे आणि ‘डेव्हलपमेंट किंग’च्या घोषणा; तर दुसऱ्या बाजूला दक्षिण मतदारसंघातील नागरिकांना खड्डेमय रस्त्यांवरून मार्गक्रमण करण्याची वेळ—या विरोधाभासाचे उत्तर स्थानिक लोकप्रतिनिधी आणि प्रशासनाने द्यावे, अशी संतप्त भावना नागरिकांतून व्यक्त होत आहे.

गणेशोत्सवाच्या आधी वडगाव परिसरातील सर्व प्रमुख आणि अंतर्गत रस्त्यांवरील खड्डे तातडीने बुजवून रस्त्यांचे दर्जेदार डांबरीकरण करावे. दुर्घटना घडल्यानंतर जागे होण्यापेक्षा त्यापूर्वीच उपाययोजना कराव्यात आणि विकासाच्या घोषणांना प्रत्यक्ष रस्त्यावर उतरवावे, अशी जोरदार मागणी वडगाव परिसरातील नागरिकांकडून होत आहे.

About Belgaum Varta

Check Also

‘बेळगांवचा कैवारी’चा अभिनव उपक्रम; गणेशोत्सवात ‘ज्ञान दान’

Spread the love  बेळगाव : गणेशोत्सव हा भक्ती, श्रद्धा आणि उत्साहाचा सण असला तरी सामाजिक …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *