
बेळगाव : “श्रील प्रभुपादांनी कठोर तपस्या करून सुरू केलेले इस्कॉनचे आंदोलन आज जगभर पोहोचले आहे. पूर्वी भक्तांची संख्या कमी होती आणि ते प्रामुख्याने मंदिरातच राहायचे. मात्र, आता मंदिराबाहेर राहून इस्कॉनची सेवा करणाऱ्या भक्तांची संख्या अगणित आहे. ही चळवळ पुढे नेण्याची आणि तिच्यावर कोणतेही गालबोट लागू न देण्याची जबाबदारी आता तरुण पिढीवर आहे,” असे प्रतिपादन इस्कॉन बेळगावचे अध्यक्ष परमपूज्य भक्ती रसामृत स्वामी महाराज यांनी केले.
इस्कॉनचे संस्थापक श्रील प्रभुपाद यांच्या १३०व्या आविर्भाव दिनानिमित्त रविवारी इस्कॉन बेळगाव येथे विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. जन्माष्टमीच्या दुसऱ्या दिवशी इस्कॉन चळवळीत हा दिवस ‘व्यास पूजा’ म्हणून साजरा केला जातो. यानिमित्त आयोजित कार्यक्रमात श्रील प्रभुपाद यांना आदरांजली वाहताना भक्ती रसामृत स्वामी महाराज बोलत होते.
श्री श्री राधा गोकुळानंद मंदिराशेजारील पटांगणात उभारलेल्या शामियान्यात श्रील प्रभुपादांचा विग्रह प्रतिष्ठापित करण्यात आला होता. आकर्षक सजावटीमुळे परिसर भक्तिमय वातावरणाने भारून गेला होता. सकाळी अभिषेकानंतर भक्ती रसामृत स्वामी महाराज यांच्या हस्ते विग्रहाला हार अर्पण करून अभिषेक करण्यात आला. त्यानंतर दीक्षित भक्तांनी अभिषेक केला.
यावेळी ५० हून अधिक भक्तांनी श्रील प्रभुपाद यांच्या कार्याविषयी मनोगत व्यक्त करून पुष्पांजली अर्पण केली.
उद्या लहान मुलांसाठी दहीहंडी
रविवारी सायंकाळी साडेचार वाजता मंदिराच्या आवारात लहान मुलांसाठी दहीहंडी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमांना भाविकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. कार्यक्रमाला सहकार्य केल्याबद्दल इस्कॉनतर्फे सर्व भाविकांचे आभार मानण्यात आले.

Belgaum Varta Belgaum Varta