
बेळगाव : गोकुळाष्टमीच्या पूजेनंतर दुसऱ्या दिवशी गोकुळाची मूर्ती विसर्जन करण्याची परंपरा अनेक ठिकाणी प्रचलित आहे. या परंपरेनुसार भक्तगण रात्री बारा वाजता पूजा करून दुसऱ्या दिवशी मूर्ती नदी, तलाव किंवा कुंडामध्ये विसर्जित करतात.
बेळगाव शहरात नदी नसल्यामुळे दरवर्षी कपिलेश्वर तलावामध्ये गोकुळाच्या मूर्तींचे विसर्जन केले जाते. दरवर्षी या ठिकाणी विसर्जनासाठी पुरेसे पाणी उपलब्ध असते. मात्र यावर्षी कपिलेश्वर तलावामध्ये एक फुटापेक्षाही कमी पाणी असल्याचे दिसून आले.
त्यामुळे भाविकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागला. नाईलाजाने केवळ ७–८ इंच पाण्यामध्येच गोकुळाच्या मूर्तींचे विसर्जन करण्यात आले. या प्रकारामुळे उपस्थित भाविकांमध्ये मोठ्या प्रमाणात नाराजी आणि संताप व्यक्त करण्यात आला.
महापालिकेच्या कर्मचाऱ्यांनी तसेच या परिसरातील नगरसेवकांनी गोकुळ विसर्जनाच्या या गंभीर समस्येची वेळीच दखल का घेतली नाही, असा सवाल उपस्थित भाविक एकमेकांना विचारत होते.

ही बाब समजताच सामाजिक कार्यकर्ते गणेश दड्डीकर, रामराज दरवंदकर तसेच माजी नगरसेवक राजू बिरजे यांनी घटनास्थळी उपस्थित राहून परिस्थिती नियंत्रणात आणण्याचा प्रयत्न केला. तसेच त्यांनी महापालिकेच्या संबंधित अधिकाऱ्यांशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला; मात्र दुर्दैवाने कोणत्याही अधिकाऱ्याकडून अपेक्षित प्रतिसाद मिळाला नाही.
गोकुळाष्टमीसारख्या पारंपरिक धार्मिक उत्सवासाठी दरवर्षी भाविक मोठ्या श्रद्धेने येत असताना, विसर्जनासाठी आवश्यक पाण्याची साधी व्यवस्था देखील महापालिकेला करता आली नाही, ही अत्यंत दुर्दैवी आणि चिंताजनक बाब आहे.
महापालिका प्रशासनाने या घटनेची गांभीर्याने दखल घेऊन भविष्यात अशा धार्मिक परंपरांच्या वेळी आवश्यक त्या सुविधा आणि योग्य नियोजन करावे, अशी मागणी नागरिकांकडून करण्यात येत आहे.

Belgaum Varta Belgaum Varta