
कारभार गल्लीतील गणेशोत्सव मंडळाचा शतकोत्सव; ढोल-ताशांच्या गजरात भव्य मिरवणूक, महिलांचा पारंपरिक वेशभूषेत सहभाग
(पत्रकार : राधिका सांबरेकर यांजकडून)
बेळगाव : ‘हृदयामध्ये स्थान तुझे, ओठांवरती नाम आहे;
केल्यास मनोभावे सेवा तुझी, चरणाशी चारधाम आहे…’
या भक्तिभावनेने शतकाची परंपरा लाभलेल्या वडगावच्या मानाच्या राजाच्या आगमनाची जय्यत तयारी सुरू आहे. सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ, कारभार गल्ली, वडगाव यांच्यातर्फे ‘वडगावचा मानाचा राजा-२०२६’ आगमन सोहळा रविवार (ता. ६) सायंकाळी सात वाजता येळ्ळूर क्रॉस येथून मोठ्या थाटामाटात होणार आहे. पारंपरिक वाद्यांचा गजर, ढोल-ताशांचा दणदणाट, मर्दानी खेळ आणि विविध आकर्षणांनी आगमन सोहळा रंगणार आहे.
‘डोळे आसुसले तुझ्या दर्शनाला’ या भावनेने भक्तगण बाप्पाच्या आगमनाची आतुरतेने प्रतीक्षा करीत असून, गेल्या आठ दिवसांपासून कारभार गल्लीमध्ये तयारीला वेग आला आहे.
शंभर वर्षांची अखंड परंपरा
कारभार गल्लीतील सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाची स्थापना १९२७ मध्ये झाली. तेव्हापासून भक्तिभावाने आणि पारंपरिक पद्धतीने गणेशोत्सव साजरा केला जात आहे. गणेशोत्सवाच्या माध्यमातून विविध सामाजिक उपक्रम राबविण्याबरोबरच लोकसहभागाची परंपराही मंडळाने जपली आहे. यंदा शतकोत्सवानिमित्त आगमन सोहळ्याला विशेष स्वरूप देण्यात आले आहे.
रविवारी येळ्ळूर क्रॉस, येळ्ळूर बस थांबा येथून ढोल-ताशांच्या गजरात मिरवणुकीला प्रारंभ होईल. एलईडी स्क्रीनवरील लाईव्ह शो, फटाक्यांची आतषबाजी, पारंपरिक वाद्यांचा गजर, मर्दानी खेळ, अश्वांचे दर्शन आणि ‘गणपती बाप्पा मोरया’चा जयघोष, अशा विविध उपक्रमांनी आगमन सोहळा भक्तिमय वातावरणात पार पडणार आहे.
महिलांचा पारंपरिक वेशभूषेत सहभाग
बाप्पाच्या आगमनासाठी संपूर्ण कारभार गल्ली गणेशमय झाली आहे. गल्लीतील दोनशेहून अधिक महिला पारंपरिक वेशभूषेत मिरवणुकीत सहभागी होणार आहेत. याशिवाय ज्येष्ठ नागरिक, पंचमंडळी, मंडळाचे कार्यकर्ते आणि युवक वर्गही आगमन सोहळ्यात सक्रिय सहभाग घेणार आहेत. सर्वांच्या सहकार्याने शतकोत्सवी गणेशोत्सव अविस्मरणीय करण्याचा मंडळाचा प्रयत्न आहे.
पारंपरिकतेला आधुनिकतेची जोड; ‘रिल्स’ स्पर्धेचे आयोजन
सध्याच्या सोशल मीडिया आणि ‘रिल्स’च्या वाढत्या क्रेझचा विचार करून मंडळाने ‘वडगावचा मानाचा राजा आगमन सोहळा-रिल्स स्पर्धा’ आयोजित केली आहे. मिरवणुकीत प्रत्यक्ष सहभागी होऊन बाप्पाच्या आगमनाचे तसेच प्रथम दर्शनाचे चित्रीकरण करून स्पर्धेत सहभागी होता येणार आहे. स्पर्धेचे नियम निश्चित करण्यात आले असून अधिक माहितीसाठी मंडळाशी संपर्क साधावा, असे मंडळाचे अध्यक्ष कुमार गडकरी यांनी सांगितले.

Belgaum Varta Belgaum Varta