
डॉल्बीला फाटा; ढोल-ताशांचा गजर, लेझीमसह पारंपरिक मिरवणुकीचे आयोजन
बेळगाव : शेकडो वर्षांची परंपरा लाभलेल्या बेळगावच्या गणेशोत्सवाची धूम सुरू झाली असून, विद्येचा अधिपती श्री गणरायाच्या आगमनासाठी शहर सज्ज झाले आहे. यंदा ‘गांधीनगरचा महाराजा’ म्हणून प्रसिद्ध असलेल्या जुने गांधीनगर, छत्रपती शिवाजी चौक, मारुती रोड येथील सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाचा अमृत महोत्सवी वर्ष सोहळा मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येणार आहे.
मंडळाच्या वतीने रविवारी ६ सप्टेंबर रोजी सायंकाळी ५ वाजता किल्ला येथील दुर्गादेवी मंदिरापासून भव्य गणेश आगमन मिरवणुकीचे आयोजन करण्यात आले आहे. ढोल-ताशांचा निनाद, पारंपरिक वाद्यांचा गजर, लेझीम पथक तसेच महिला व युवक मंडळांचा उत्स्फूर्त सहभाग हे या मिरवणुकीचे प्रमुख आकर्षण ठरणार आहे.
किल्ला येथील दुर्गादेवी मंदिरापासून मिरवणुकीला प्रारंभ होऊन किल्ला तलाव मार्गे ती जुने गांधीनगर येथील छत्रपती शिवाजी चौकात दाखल होणार आहे. तेथे ‘गांधीनगरचा महाराजा’चे भव्य स्वागत करण्यात येणार आहे. भारतीय संस्कृती आणि पारंपरिक गणेशोत्सवाचे दर्शन घडविणारा हा आगमन सोहळा गांधीनगरची शान ठरणार आहे.
७५ वर्षांची गौरवशाली परंपरा लाभलेल्या मंडळाचा यंदाचा अमृत महोत्सव असल्याने आगमन सोहळ्याचे विशेष नियोजन करण्यात आले आहे. मनोहर पाटील यांच्या कार्यशाळेत ‘उगवता सूर्य शक्ती’ या संकल्पनेवर आधारित गणेशमूर्ती साकारण्यात आली आहे.
विशेष म्हणजे, आधुनिकतेच्या नावाखाली वाढत चाललेल्या डॉल्बीच्या कर्णकर्कश आवाजाला फाटा देत मंडळाने पारंपरिक वाद्यांना प्राधान्य दिले आहे. ढोल-ताशा, लेझीम आणि पारंपरिक वाद्यांच्या गजरात शिस्तबद्ध पद्धतीने मिरवणूक काढण्यात येणार आहे. त्यामुळे भक्ती, परंपरा आणि भारतीय संस्कृतीचा अनोखा संगम या आगमन सोहळ्यात अनुभवायला मिळणार आहे.
मंडळाचे अध्यक्ष रवी निर्मळकर, उपाध्यक्ष रवी तुक्कार, नितीन मुरकुटे, खजिनदार संतोष कटारे तसेच मंडळाचे कार्यकर्ते यांच्या मार्गदर्शनाखाली या भव्य आगमन सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे.

Belgaum Varta Belgaum Varta