
बळ्ळारी : कर्नाटक भाजपच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या ‘बळ्ळारी चलो’ पदयात्रेत भाजप महिला मोर्चाच्या कर्नाटक राज्य सचिव डॉ. सोनाली सरनोबत यांनी रविवारी उत्स्फूर्तपणे सहभाग घेतला.

आजचा आंदोलनाचा कार्यक्रम विशेषतः भाजप महिला मोर्चासाठी आयोजित करण्यात आला होता. राज्यातील विविध जिल्ह्यांतून मोठ्या संख्येने महिला कार्यकर्त्या व पदाधिकारी या आंदोलनात सहभागी झाल्या. यावेळी काँग्रेस सरकारविरोधात जोरदार घोषणाबाजी करत सरकारच्या कारभाराबद्दल संताप व्यक्त करण्यात आला.
महिला मोर्चाच्या वतीने कर्नाटक भाजपचे प्रदेशाध्यक्ष बी. वाय. विजयेंद्र यांचे आरती ओवाळून स्वागत करण्यात आले. महिला शक्ती, एकता आणि संघर्षाचे प्रतीक म्हणून त्यांना गदेचे स्मृतिचिन्ह देऊन सन्मानित करण्यात आले.
डॉ. सोनाली सरनोबत यांनी बेळगावातील महिला कार्यकर्त्यांसह पदयात्रेत सक्रिय सहभाग घेतला. भ्रष्टाचाराचे आरोप, जनविरोधी धोरणे आणि सरकारच्या कारभारातील पारदर्शकतेच्या मुद्द्यावर त्यांनी आंदोलनात सहभाग नोंदविला.
भाजपने राज्यातील भ्रष्टाचाराच्या आरोपांवर सरकारने स्पष्टीकरण द्यावे, दुष्काळग्रस्त जिल्ह्यांची योग्य घोषणा करावी, दुष्काळामुळे अडचणीत आलेल्या शेतकऱ्यांना योग्य नुकसानभरपाई द्यावी तसेच गृहलक्ष्मी योजनेतील कथित भ्रष्टाचाराच्या आरोपांना सरकारने उत्तर द्यावे, अशा मागण्या केल्या.
सरकारी योजनांमध्ये पारदर्शकता आणि जनतेच्या पैशांच्या वापराबाबत जबाबदारी निश्चित करण्याची मागणीही यावेळी करण्यात आली. भाजपच्या सातत्यपूर्ण आंदोलनामुळे मंत्री बी. नागेंद्र यांना राजीनामा देण्याची परिस्थिती निर्माण झाल्याचा दावा भाजपकडून करण्यात आला.
जनतेच्या प्रश्नांना उत्तरे मिळेपर्यंत आणि शासनाच्या कारभारात पारदर्शकता व जबाबदारी सुनिश्चित होईपर्यंत भाजपचा संघर्ष सुरूच राहील, असा इशारा यावेळी देण्यात आला.

Belgaum Varta Belgaum Varta