
बेळगाव : मराठी विद्यानिकेतनमध्ये शिक्षक दिन साजरा करण्यात आला. शाळेतील इंग्रजी विषयाच्या शिक्षिका रोहिणी सावंत यांनी डॉ.सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. इयत्ता तिसरी ‘अ’ च्या विद्यार्थ्यांनी वर्गशिक्षिका मुक्ता आलगोंडी यांच्या मार्गदर्शनाखाली ‘ज्ञानाचे भांडार’ही कविता सादर केली. विद्यार्थी अनय जोतिबा खन्नूकर या विद्यार्थ्याने शिक्षक दिनाबद्दल आपले मनोगत व्यक्त केले. इयत्ता तिसरीच्या विद्यार्थ्यांनी डॉ.सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्याबद्दल भित्तीपत्रके तयार केली. इयत्ता दहावीच्या विद्यार्थ्यांनी एक दिवस शिक्षक होऊन विद्या देण्याचा अनुभव घेतला. या निमित्ताने शिक्षकांसाठी घेण्यात आलेल्या कविसंमेलन आणि बौद्धिक खेळांच्या गटकार्यातून उत्साहपूर्ण वातावरणात शिक्षक दिन साजरा करण्यात आला.
यावेळी शाळा सुधारणा समितीचे अध्यक्ष सुभाष ओऊळकर, पर्यावरणवादी कार्यकर्ते डॉ. शिवाजीदादा कागणीकर यांनी विद्यार्थी आणि समाज घडविण्यासाठी शिक्षकांची भूमिका खूप मोलाची असल्याचे सांगून शिक्षकांना शुभेच्छा दिल्या. शाळा सुधारणा समिती उपाध्यक्ष सुरेश पाटील, माध्यमिक विभागाचे मुख्याध्यापक नारायण उडकेकर, प्राथमिक विभागाचे मुख्याध्यापक बी.जी. पाटील, समन्वयक नीला आपटे, शिक्षक समन्वयक सविता पवार, बालवाडी विभाग प्रमुख सीमा कंग्राळकर, शैक्षणिक समुपदेशक गौरी चौगुले, सांस्कृतिक विभाग प्रमुख धीरजसिंह राजपूत, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.

Belgaum Varta Belgaum Varta